रणजी ट्रॉफी 2025-026 च्या स्पर्धेतून अजिंक्य राहणेची माघार(फोटो-सोशल मीडिया)
Ajinkya Rahane withdraws from the Ranji Trophy : बीसीसीआय आयोजित २०२५-२६ रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीला २२ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या फेरीच्या सुरुवातीपूर्वीच मुंबई संघाला मोठा झटका बसला आहे. अनुभवी भारतीय खेळाडू आणि मुंबई संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामातून माघार घेतली आहे. अजिंक्य रहाणे यापुढे या हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार नाही.
अजिंक्य रहाणेकडून मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवण्यात आले आहे की, तो वैयक्तिक कारणांमुळे या हंगामातील रेड-बॉल सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाही. मुंबई संघ लीगच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नवीन संघ निवडणार आहे. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचे हैदराबाद आणि दिल्लीविरुद्ध महत्त्वाचे सामने असणार आहेत.
हेही वाचा : IND vs NZ, 3rd ODI : भारताला फिरकी रणनीतीचा विचार करावा लागणार; दोन सामन्यात फिरकी गोलंदाजांकडून निराशा
२०२५-२६ च्या स्थानिक हंगामापूर्वी अजिंक्य रहाणेने मुंबईचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला, मुंबईची धुरा शार्दुल ठाकूरकडे देण्यात आली होती. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०२३-२४ मध्ये रणजी करंडकाच्या जेतेपदावर नाव कोरत तब्बल सात वर्षांचा दुष्काळ संपवला होता. मागील हंगामात रणजी करंडक उपांत्य फेरीत मुंबईला विदर्भाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
अजिंक्य रहाणे हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. २००७ ते २०२५ पर्यंत त्याने ८० सामन्यांमध्ये ५७.१८ च्या सरासरीने ६,१४१ धावा फटकावल्या आहेत. रहाणे फक्त वसीम जाफरच्या मागे आहे. रहाणेने मुंबईकडून १९ शतके झळकावली आहेत. अजिंक्य रहाणे हा केवळ मुंबई आणि भारतीय स्थानिक क्रिकेटसाठीच नव्हे तर भारतीय संघासाठी देखील एक प्रमुख फलंदाज आहे. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकून दिली होती.
हेही वाचा : Ind vs NZ, 1st T20 match: आज भारतीय संघ नागपुरात पोहचणार; चाहत्यांची होणार विमानतळावर गर्दी
जुलै २०२३ पासून भारतीय संघाबाहेर असणारा अजिंक्य रहाणेने भाररतासाठी ८५ कसोटी सामन्यांमध्ये १४४ डावांमध्ये ५,०७७ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने १२ शतके आणि २६ अर्धशतके लागावली आहेत. तसेच ९० एकदिवसीय सामन्यांमध्ये ३ शतके आणि २४ अर्धशतकांसह २९६२ धावा तर २० T20 मध्ये एका अर्धशतकासह ३७५ धावा काढल्या आहेत.
अजिंक्य रहाणे आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा आहे. अजिंक्य रहाणे या हंगामात संघाचे नेतृत्व करताना दिसेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. केकेआरचा मागील हंगाम विशेष चांगला राहिला नव्हता.






