नीरज चोप्रा(फोटो-सोशल मीडिया)
Neeraj Chopra : भारतासाठी दोन ऑलिंपिक पदके जिंकणाऱ्या नीरज चोप्राच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला गेला आहे. त्याला एक विशेष पदक मिळाले आहे. नीरज चोप्राचा भारतीय सैन्याकडून मोठा सन्मान करण्यात आला आहे. चोप्राला प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलचे मानद पद देण्यात आले आहे. २०२० च्या ऑलिंपिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून भारताची मान जगात ताठ केली. त्याच वेळी, त्याने २०२४ च्या ऑलिंपिकमध्ये देखील रौप्य पदकाची कमाई करून पुन्हा देशाचे नाव उंचावले.
संरक्षण मंत्रालयाची नीरज चोप्रा यांना सन्मानित करण्याची घोषणा भारत सरकारच्या मासिक गॅझेट ऑफ इंडियामध्ये करण्यात आली होती. त्याला हा दर्जा १६ एप्रिल २०२५ पासून लागू झाला आहे. याआधी नीरज चोप्रा प्रादेशिक सैन्यात सुभेदार पदावर होता. आता त्याला प्रमोशन देण्यात आले आहे. त्यानंतर चोप्रा लेफ्टनंट कर्नल झाला आहे.
प्रादेशिक सेना ही मुख्य सैन्याच्या दुसऱ्या रांगेचे काम करत असते. त्याचे सदस्य हे सामान्य लोक असतात, जे इतर व्यवसायांशी संबंधित आहेत. प्रादेशिक सैन्याच्या सदस्यांना लष्करी प्रशिक्षण दिले जाते आणि आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत त्यांची मदत घेण्यात येत असते. प्रादेशिक सैन्याचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे सैन्याला मदत करणे हे असते.
नीरज चोप्रा याच्यापूर्वी भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव, महेंद्रसिंग धोनी आणि अभिनव बिंद्रा यांसारख्या खेळाडूंना प्रादेशिक सैन्यात मानद पदव्या देण्यात आल्या आहेत. तसेच नाना पाटेकर, सचिन पायलट आणि अनुराग ठाकूर हे देखील या सैन्याचा एक भाग आहेत.
पोलंडमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा सहभागी होणार आहे. त्याच्यासमोर दोन वेळा विश्वविजेता आणि पॅरिस ऑलिंपिक कांस्यपदक विजेता ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स, जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि राष्ट्रीय विक्रमधारक पोलंडचा मार्सिन क्रुकोव्स्की तसेच सायप्रियन मर्झिग्लोड आणि डेव्हिड वॅग्नर सारख्या स्थानिक खेळाडूंचे तगडे आव्हान असणार आहे.
पोलंडमध्ये आयोजित होणारी ही स्पर्धा नीरजसाठी या हंगामातील तिसरी स्पर्धा असणार आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेत आपली मोहीम सुरू केली आणि आता तो १६ मे रोजी दोहा डायमंड लीगमध्ये भाग घेणार आहे. जिथे त्याने २०२३ मध्ये (८८.६७ मीटर) विजेतेपद जिंकले आणि २०२४ मध्ये (८८.३६ मीटर) दुसरे स्थान पटकावले होते. दोहामध्येही नीरजला पीटर्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.