श्रेयस अय्यर आणि रजत पाटीदार(फोटो-सोशल मीडिया)
PBKS vs RCB : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील पहिला क्वालिफायर १ सामन्याचा थरार आज बघायाल मिळणार आहे. आज २९ मे रोजी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ही दोन संघ आमनेसामने असणार आहेत. जो कोणी हा सामना जिंकेल तो थेट आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीमध्ये धडक मारेल. हा महत्त्वाचा सामना मुल्लानपूरमधील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे.
न्यू चंदीगडमधील मुल्लानपूरच्या क्रिकेट स्टेडियमची खास गोष्ट म्हणजे हे मैदान पंजाब किंग्जचे होम ग्राउंड आहे, त्यामुळे पंजाब संघाला या गोष्टीचा फायदा मिळू शकतो. तथापि, आरसीबी देखील जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, विशेषतः घराबाहेर देखील त्यांचा खेळ जबरदस्त राहिला आहे. अशा परिस्थितीत, आज ही खेळपट्टी कोणाला मदत करणार आहे? याबाबत माहिती घेऊया.
मुल्लानपूरची खेळपट्टी सामान्यतः फलंदाजांना पोषक राहिली आहे. येथे बॅटवर चेंडू सहज येतो, ज्यामुळे मोठे फटके मारणे सोपे होऊन जाते. त्याच वेळी, नवीन चेंडू सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना थोडी मदत करत आल्याचे चित्र आहे. सामना जसजसा पुढे सरकत जाईल खेळपट्टी मंदावण्याची शक्यता आहे. ज्यामुळे येथे फिरकी गोलंदाजांना त्याची मदत मिळते. तथापि, संध्याकाळच्या सामन्यात दव हा एक मोठा घटक महत्वाची भूमिका बाजावू शकतो. दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
आकडेवारीबद्दल सांगायचे झाले तर, मुल्लानपूर मैदानावर आतापर्यंत एकूण ९ सामने खेळवण्यात आले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५ सामने जिंकले असून नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने ४ सामने खिशात घातले आहेत. या मैदानावर पहिल्या डावाची सरासरी १६९ धावा अशी राहिली आहे. अशा परिस्थितीत, आजच्या सामन्यात नाणेफेकिचा कौल कुणाकडे जातो यावरही आजचे गणित समजेल.
हेही वाचा : IND Vs END : इंग्लंड दौऱ्यात Shreyas Iyer ला स्थान नाही, Gautam Gambhir ने चार शब्दांत संपवला विषय…
पंजाब किंग्ज आणि आरसीबी या दोन्ही संघांनी आयपीएल २०२५ मध्ये शानदार प्रदर्शन केले आहे. या हंगामात दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ केला आहे. अशा परिस्थितीत, आजचा सामना खूप रोचक होणार आहे. लीग टप्प्यापर्यंत, पंजाब किंग्जने १४ पैकी ९ सामने जिंकून पॉइंट टेबलमध्ये पहिलं स्थान प्राप्त केले आहे. तर आरसीबीने देखील १४ पैकी ९ सामने जिंकून पॉइंट टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे. परंतु, चांगल्या रन रेटमुळे पंजाबने पहिल्या स्थानावर बाजी मारली आहे.