India Canada संबंधात नवे पर्व! पंतप्रधान कार्नी उद्यापासून भारत दौऱ्यावर; भारतासोबत ७० अब्ज डॉलर्स व्यापाराचे लक्ष्य (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या दौऱ्याची सुरुवात भारताची आर्थिक राजधानी मुंबई येथून होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत कॅनेडियन सीईओ, उद्योजक, आर्थिक तज्ञ आणि गुंतवणूकदारही येणार आहेत. यावेळी मुंबईतील कॅनेडियन पेन्शन फंड आणि भारतीय पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूकीच्या संधीवर चर्चा होईल. तेसच नवोपक्रमात आणि शिक्षणाच्या क्षेत्रातील करारांवरही चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
तसेच मुंबईतील दोन दिवसीय दौऱ्यानंतर मार्क कार्नी १ मार्च रोजी नवी दिल्लीत पोहोचतील. यावेळी २ मार्च रोजी हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान मोदी यांची ते भेट घेतील. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय व्यापार करारांवर चर्चा होईल. दोन्ही देशांनी २०३० पर्यंत ७० अब्ज डॉलर्सपर्यंत द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष्य ठेवले आहे. याशिवाय व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, महत्त्वाची खनिजे, शेती आणि संरक्षण यांसारख्या क्षेत्रातही सहकार्याचा आढावा घेतला जाणार आहे.
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर यांची १८ जून २०२३ रोजी हत्या करण्यात आली होती. कॅनडातील एका गुरुद्वाराबाहेर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. दरम्यान निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी भारताच्या सहभागाचा आरोप केला होता. ज्यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले गेले. परंतु कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याच्या सकारात्मक दृष्टीकोनाने संबंधामध्ये पुन्हा सुधारणा होताना दिसत आहे. कार्नी यांचा हा दौरा दोन्ही देशांतील संबंधासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
भारत-कॅनडा संबंधामध्ये नव्या पर्वाची सुरुवात? पंतप्रधान मार्क कार्नी लवकरच भारत दौऱ्यावर येणार






