बीसीसीआयच्या (BCCI) निवडणुकीनंतर आता आज मुंबई क्रिकेट असोसिएशनची (MCA) निवडणूक पारपडणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी ३८० मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदिप पाटील यांच्यात अध्यक्ष पदासाठी चुरस रंगणार आहे.
निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा पॅनल एकत्र निवडणूक लढवत आहे. माजी कसोटीवीर संदिप पाटील यांसह राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हेही पवार-शेलार पॅनेलकडून कार्यकारिणीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
आज होणाऱ्या एमसीएच्या निवडणुकीत एकूण ३८० मतदार मतदान करणार असून त्यामध्ये मैदान क्लब्स २११, ऑफिस क्लब्स ७८, स्कूल कॉलेज क्लब्स ४० आणि माजी कसोटीवीर ५१ असे मतदार आहेत. त्यामुळं आता आजच्या या अमोल काळे विरुद्ध संदीप पाटील लढतीत कोण बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे. आज दुपारी ३ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पारपडणार आहे.