भुवनेश्वर कुमार(फोटो-सोशल मिडिया)
RCB vs DC : आयपीएल 2025 मध्ये काल झालेल्या ४६ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून विजय मिळवला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या घरच्या मैदानावरच 6 विकेट्सने पराभूत केले आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करत १६२ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विराट कोहली आणि कृणाल पंड्या यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीवर विजय मिळवला आहे. या विजयासह आरसीबीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने एक खास कामगिरी करून दाखवली आहे. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
भुवनेश्वर कुमारने पीयूष चावलाला मागे टाकत ही कामगिरी करून दाखवली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध भुवनेश्वर कुमारने चार ओव्हर मध्ये ३३ धावा देत तीन बळी मिळवले. या सामन्यात भुवनेश्वरने केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा या महत्वाच्या फलंदाजांना बाद केले. त्याने तीन बळी घेऊन हा विक्रम स्थापित केला.
१७ व्या षटकात आशुतोषला बाद करून भुवनेश्वरने लेग-स्पिनर पीयूष चावलासह १९२ बळींची बरोबरी केली. त्यानंतर भुवनेश्वरने स्टब्सला बाद करून चावलाला मागे टाकले. भुवनेश्वरच्या नावावर आता १८५ सामन्यांमध्ये १९३ बळी जमा आहेत. पीयूष चावलाने १९२ सामन्यांमध्ये १९२ बळी घेण्याची कामगिरी केली होती.
सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत युजवेंद्र चहल पहिल्या स्थानावर आहे. त्याने १६९ सामन्यांमध्ये २१४ विकेट्स घेतल्या आहेत. फिरकीपटूंचे वर्चस्व असणाऱ्या आयपीएलच्या टॉप पाच विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर हा एकमेव वेगवान गोलंदाज आहे. सुनील नारायण १८७ विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे, तर रविचंद्रन अश्विन १८५ विकेट्ससह या यादीत पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे.
हेही वाचा : Shoaib Akhtar वर कारवाईचा बडगा! Pahalgam Terrorist Attack नंतर भारताने घेतला ‘हा’ कठोर निर्णय…
भुवनेश्वरने या आयपीएलमध्ये आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. यांमध्ये त्याने १२ विकेट्स घेतल्या आहेत. आरसीबी या हंगामात शानदार कामगिरी करता आहे. दिल्ली कॅपिटल्सला हरवून आरसीबी संघ पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहचला आहे. या विजयात भुवनेश्वर कुमारने तीन विकेट्स घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भुवनेश्वर कुमार आतापर्यंत तीन फ्रँचायझींसाठी खेळला आहे. ज्यामध्ये तो पुणे वॉरियर्स इंडिया, सनरायझर्स हैदराबाद आणि आता आरसीबीकडून खेळत आहे. भुवनेश्वरने सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वाधिक ११ हंगाम खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने संघाला एक वेळ विजेता होण्यास मोठी मदत केली आहे.