भारतीय पुरुष क्रिकेट संघातील स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आज त्याचा २९ वा वाढदिवस साजरा करीत आहे. हार्दिक सध्या भारतीय संघासोबत टी २० विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला असून तो भारताला विश्वचषक मिळवून देण्यासाठी प्रयन्त करणार आहे. कधी काळी मध्यमवर्गीय घरातील मुलगा असलेला हार्दिक पांड्या एक दिवस भारतीय संघासाठी खेळून संपूर्ण जगभरात आपले आणि देशाचे नाव उज्ज्वल करेल अशी कोणाला कल्पना देखील नव्हती. मात्र हार्दिकने त्याच्या मेहेनतीच्या जोरावर त्याची सर्व स्वप्न पूर्ण केली आहेत.
क्रिकेटपटू हार्दिक पंड्याच्या कारकिर्दीवर एक नजर टाकुयात,
हार्दिकचा पांड्याचा जन्म ११ ऑक्टोबर १९९३ रोजी सुरत जिल्ह्यातील एका गावात झाला. त्याचे बालपण संघर्षांमध्ये गेले. जेव्हा तो५ वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या वडिलांचा व्यवसाय पूर्णपणे संपला होता. कुटुंबाला एक वेळच्या जेवणाचीही भ्रांत जाणवत होती. परंतु वडील हिमांशू पंड्या (Himanshu Pandya) यांनी हार्दिक आणि त्याचा भाऊ कृणाल (Krunal Pandya) यांना क्रिकेटपटू करण्याचे स्वप्न भंगू दिले नाही. ते सुरतहून बडोद्याला आले आणि दोन्ही मुलांना किरण मोरे यांच्या क्रिकेट अकादमीमध्ये (Kiran more cricket academy) पाठवले. आणि हाच निर्णय हार्दिकचे आयुष्य बदलणारा ठरला.
मोरे यांच्या अकादमीमध्ये हार्दिकने क्रिकेटचा खूप सराव केला. आणि तो एक उत्तम फलंदाज तसेच गोलंदाजही बनला. २०१३-१४ मध्ये त्याने बडोद्यासाठी देशांतर्गत क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. त्याच हंगामात हार्दिकने बडोद्याबरोबरची सय्यद मुश्ताक अली करंडक, टी -२० स्पर्धाही जिंकली. त्याला २०१५ मध्ये आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाने खरेदी करत आपल्या ताफ्यात घेतले. आयपीएलच्या त्याच हंगामात त्याने केकेआर विरुद्ध ३१ चेंडूत ६१ धावा केल्या. त्यानंतर त्याने जानेवारी २०१६ मध्ये सय्यद मुश्ताक अली करंडकात बडोद्यासाठी १० डावांमध्ये ३७७ धावा केल्या. हार्दिकने स्पर्धेत १० विकेट्सही घेतल्या. हार्दिकच्या अष्टपैलू खेळीमुळे बडोद्याने अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेनंतर लगेच त्याला टीम इंडियामध्ये सामील होण्यासाठी कॉल आला.
हार्दिकने जानेवारी २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी -२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. हार्दिकने भारतासाठी आतापर्यंत ११ कसोटी, ६३ एकदिवसीय आणि ४९ टी -२० सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये १२८६ धावा, कसोटीत ५३२ धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ शतकासह ११ अर्धशतके देखील केली आहेत. त्याने तीनही फॉरमॅटमध्ये तब्बल ११६ विकेट्स घेतल्या आहेत. कर्णधार हार्दिक पंड्याने २०२२ आयपीएल मध्ये गुजरात टायटन्सला पहिल्यांदाच विजेतेपद जिंकवून दिले होते.