क्रिस्टियानो रोनाल्डो(फोटो-सोशल मीडिया)
Cristiano Ronaldo to play against Indian team : भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी एक आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे. जगातील प्रसिद्ध फुटबॉलपटूंपैकी एक असलेला पोर्तुगालचा स्टार खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो भारतीय संघ एफसी गोवा विरुद्ध खेळताना दिसणार आहे. वृत्तानुसार, रोनाल्डोला आगामी एएफसी चॅम्पियन्स लीग ग्रुप डी सामन्यासाठी सौदी अरेबियाच्या क्लब अल नसर संघात समाविष्ट केले गेले आहे. या बातमीमुळे भारतातील फुटबॉल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाल्याचे दिसत आहे.
हेही वाचा : पंजाबमध्ये ‘खेळ’ रक्तरंजित! लुधियानामध्ये कबड्डी खेळाडूची गोळ्या घालून हत्या; ‘या’ टोळीने स्वीकारली जबाबदारी
एका वृत्तानुसार, रोनाल्डोचा एफसी गोवा विरुद्धचा सामना बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे खेळवण्यात येणार आहे. भारतीय चाहत्यांना सुरुवातीला अपेक्षा होती की, रोनाल्डो रिव्हर्स लेग दरम्यान भारतात येऊन गोव्याच्या भूमीवर खेळेल, परंतु ते सत्यात उतरू शकले नाही. आता, सौदी अरेबियाच्या मीडिया आउटलेट अल रियादियाहकडून वृत्त देण्यात आले आहे की, रोनाल्डो यावेळी एफसी गोवा विरुद्ध खेळण्याची शक्यता आहे.
मागील सामन्यात रोनाल्डो मैदानावर हजर राहू शकला नाही. त्यावेळी अल नासरचे प्रशिक्षक जॉर्ज जिझस यांच्याकडून असे संकेत देण्यात आले आहे की, रोनाल्डोला अनावश्यक शारीरिक थकव्यापासून वाचवण्यासाठी रणनीतीवर क्लब काम करत आहे. प्रशिक्षकांच्या मते, संघाच्या व्यस्त घरगुती आणि खंडीय वेळापत्रकामुळे रोनाल्डोला विश्रांती दिली होती. तथापि, आता परिस्थिती अनुकूल असून आगामी सामन्यात खेळेल अशी शक्यता आहे.
दुसरीकडे, एफसी गोवाची या हंगामातील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. इंडियन सुपर लीगमध्ये संघाची कामगिरी आतापर्यंत सुमारच राहिली आहे. गोवा सध्या ग्रुप डी पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. आतापर्यंतच्या या तिन्ही सामन्यांमध्ये संघाला सलग पराभव स्वीकारावा लागला आहे. ज्यामुळे खेळाडू आणि चाहते दोघांमध्ये देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रोनाल्डोच्या मैदानात पुनरागमनाची बातमी समोर आल्याने भारतीय चाहत्यांचा उत्साहात वाढ झाली आहे. रोनाल्डोला मैदानात लाईव्ह अॅक्शनमध्ये पाहण्याची खूप दिवसांपासून इच्छा असलेल्या चाहत्यांसाठी हा एक उत्सवच असणार आहे. असे म्हटले जात आहे की, मोठ्या संख्येने भारतीय चाहते हा सामना पाहण्यासाठी किंवा टीव्ही स्क्रीनवर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक असणार आहेत.
हेही वाचा : ICC Ranking: नाद करा ‘हिटमॅन’चा कुठं! 38 व्या वर्षीही रोहित शर्माचा पहिल्या स्थानी दबदबा; गिल आणि आझमला झटका
भारतीय फुटबॉलसाठीही एक ऐतिहासिक क्षण ठरण्याची शक्यता आहे. कारण जगातील सर्वात मोठा फुटबॉल स्टार पहिल्यांदाच भारतीय क्लबविरुद्ध मैदानात खेळताना दिसणार आहे.






