फोटो सौजन्य - AsianCricketCouncil सोशल मिडिया
अंडर 19 आशिया कप फायनलचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली आणि टीम इंडियाचा फायनलच्या सामन्यामध्ये पराभव झाला. संपूर्ण स्पर्धेमध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली होती पण भारताचे फलंदाज फायनलच्या सामन्यामध्ये खराब कामगिरी केल्यामुळे आशिया कप 2025 ची ट्राॅफी पाकिस्तानच्या नावावर झाली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोमवारी त्यांच्या देशाच्या १९ वर्षांखालील आशिया कप विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला १ कोटी रुपयांचे विशेष रोख बक्षीस जाहीर केले. रविवारी दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या युवा संघाने भारताला १९१ धावांनी हरवून विजेतेपद पटकावले. इस्लामाबाद येथे संघ आणि त्यांच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आयोजित स्वागत समारंभात शरीफ यांनी ही घोषणा केली.
स्वागत समारंभानंतर संघाचे मार्गदर्शक आणि व्यवस्थापक सरफराज अहमद यांनी माध्यमांना सांगितले की, पंतप्रधानांनी प्रत्येक खेळाडूला १ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. यापूर्वी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी आशिया कप विजेत्या ज्युनियर संघाच्या खेळाडूंना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केल्याचे वृत्त आहे.
दुबईमध्ये भारताला हरवून आशिया कप जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील संघाचे मायदेशी परतल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ त्यांच्यासाठी स्वागत समारंभाचे आयोजन करतील. इस्लामाबाद विमानतळावर संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. सहसा वरिष्ठ संघांचे असे स्वागत केले जाते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी आधीच या विजयाला देशातील खेळासाठी मोठी कामगिरी असल्याचे घोषित केले होते. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात १७२ धावा करणारा समीर मिन्हास आणि चार विकेट घेणारा वेगवान गोलंदाज अली रझा यांना पाकिस्तान क्रिकेटचे भविष्य मानले जात आहे.
रविवारी झालेल्या अंडर-१९ वनडे आशिया कपच्या एकतर्फी अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा १९१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. अशा प्रकारे पाकिस्तानने त्यांचे दुसरे अंडर-१९ आशिया कप विजेतेपद जिंकले. गेल्या काही काळापासून सुरू असलेली परंपरा कायम ठेवत, दोन्ही संघांच्या खेळाडूंनी सामन्यानंतर एकमेकांना अभिवादन करणे (हात हलवणे) टाळले. मिन्हासच्या ११३ चेंडूत १७ चौकार आणि नऊ षटकारांच्या मदतीने १७२ धावांच्या जोरावर पाकिस्तानने आठ विकेट गमावून ३४७ धावा केल्या आणि त्यानंतर भारताला २६.२ षटकांत १५६ धावांवर गुंडाळले.






