अमेलिया केर(फोटो-सोशल मीडिया)
Amelia Kerr makes history at WPL : नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर महिला प्रीमियर लीग २०२६ च्या १० वा सामना खेळला गेला. या सामन्यात यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा २२ धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना यूपीने कर्णधार मेग लॅनिंग आणि फोबी लिचफील्ड यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ८ गडी गमावून १८७ धावा उभ्या केल्या होत्या. मुंबई इंडियन्सकहा संघ २० षटकात ६ गडी गमावून फक्त १६५ धावाच करू शकला. या दरम्यान, या सामन्यात न्यूझीलंडची स्टार अष्टपैलू अमेलिया केरने इतिहास घडवला आहे. महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात ५० विकेट्स घेणारी ती पहिली गोलंदाज ठरली आहे.
हेही वाचा : INDU19 vs BANU19: U19 World Cup मध्ये अब्रार-वैभव सूर्यवंशी भिडले! चालू सामन्यात गोंधळ; वाचा सविस्तर
२५ वर्षीय वेलिंग्टन क्रिकेटर अमेलिया केरने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या महिला प्रीमियर लीग २०२६ च्या तिच्या चौथ्या लीग सामन्यामध्ये मुंबई इंडियन्ससाठी शानदार गोलंदाजी करत आपली क्षमता दाखवून दिली. तिने ४ षटकांमध्ये २८ धावा देत तीन महत्त्वपूर्ण विकेट्स चटकावल्या. केरने तिचा पहिला बळी २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर घेतला.
अमेलिया केरने २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हरलीन देओलला स्टंप केले. त्यानंतर केरने चौथ्या चेंडूवर सोफी एक्लेस्टोनला माघारी पाठवले. केरने डावाच्या शेवटच्या चेंडूवर दीप्ती शर्माला आपली शिकार बनवले. दीप्ती फक्त दोन चेंडू खेळले आणि ती तिचे खाते देखील उघडू शकली नाही. या विकेटसह केरने महिला प्रीमियर लीगमध्ये तिचा ५० वा बळी पूर्ण केला आणि इतिहास रचला.
केरने आतापर्यंत मुंबई इंडियन्ससाठी ३४ महिला प्रीमियर लीग सामने खेळले असून एकूण ५० बळी घेतले आहेत. या कामगिरीसह, ती महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आली आहे. तिच्यानंतर तिची सहकारी हेली मॅथ्यूज आहे, जिने आतापर्यंत ३१ सामन्यांमध्ये ४३ फलंदाजांना बाद करण्याची किमया साधली आहे.
हेही वाचा : INDU19 vs BANU19: वैभव सूर्यवंशीचा विश्वचषकात धुराळा! युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये मोडला विराट कोहलीचा विक्रम
शनिवारी अमेलिया केरने तीन बळी घेतल्याने महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये तिच्या पाच सामन्यांमधील एकूण बळींची संख्या १० वर जाऊन पोहचली आहे. या कामगिरीसह, तिने पर्पल कॅपच्या शर्यतीत आपली आघाडी घेतली आहे.






