विराट कोहली(फोटो-सोशल मिडिया)
virat kohli test retirement : भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंडचा दौऱ्यावर जाणार आहे. जिथे संघ इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि यशस्वी कर्णधार रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर आता अशीही चर्चा समोर आली आहे की, विराट कोहली देखील कसोटीला अलविदा म्हणण्याचा विचार करत आहे.
विराट कोहलीबाबत एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीने देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता, त्याने बीसीसीआयलाही याबद्दल माहिती देखील दिली होती. तथापि, बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याला निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती करण्यात आली आहे.
रोहित शर्माने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे . रोहितच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर काही दिवसांतच कोहलीचा हा निर्णय आला आहे. त्यानंतर आता बीसीसीआयसमोर एक मोठी समस्याच उभी राहिली आहे. रोहित आणि विराट दोघेही भारतीय संघाचे महत्त्वाचे भाग आहेत, त्यामुळे बीसीसीआयला दोन्ही खेळाडूंसाठी एकत्रितपणे पर्यायी खेळाडू शोधणे खूप अवघड जाणार आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात दौऱ्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपासून विराट कोहली त्याच्या कसोटी भविष्याचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्या कसोटीत कोहलीने शतक ठोकले, पण त्यानंतर त्याला साजेशी खेळी करता आलेली नाही. तो एकाच पद्धतीने बाद होत राहिला. त्याबाबत त्याच्यावर टीका देखील झाली होती.
जर विराट कोहली त्याच्या निवृत्तीच्या निर्णयावर ठाम राहिला तर त्याच्या आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला कमी अनुभव असणाऱ्या संघासह इंग्लंड दौऱ्यावर जावं लागणार आहे. शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल सारख्या तरुण खेळाडूंवर टॉप ऑर्डरची जबाबदारी असणार आहे, तर ऋषभ पंतवर मधल्या फळीतील महत्त्वाची जबाबदारी असेल.
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती लवकरच इंग्लंड दौऱ्यावरील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघ निवडण्यासाठी बैठक घेणार असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या जागी सलामी फलंदाजीची जबाबदारी कोणत्या खेळाडूवर देता येणार? यावर आता विचार केला जात आहे. तसेच, संघाच्या कर्णधारपदाचा देखील विचार केला जाईल.
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर, निवड समिती आधीच नवीन कसोटी कर्णधाराच्या शोधात आहे. जर आता कोहलीनेही निवृत्ती घेतली तर तो संघ आणि निवड समिती दोघांसाठी देखील एक मोठा धक्का असू शकतो.