विराट कोहली आणि रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : पाकिस्तानला भारतीय जवानांनी दिलेल्या उत्तराचे सर्वत्र कौतुक होत आहे. विराट कोहली व रोहित शर्मा या भारतीय क्रिकेट संघातील दोन दिग्गजांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहून भारतीय जवानांचे आभार मानले आहे. भारतीय सैन्य पाकिस्तानचा भारतावरील भ्याड हल्ला यशस्वीरित्या निष्फळ करून त्यांनी केलेल्या दृढनिश्चयाचे त्यांनी कौतुक केले आहे. संकटाच्या काळात देशासाठी उभे राहिल्याबद्दल भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाचा त्यांना अभिमान आहे असे रोहित शर्मा म्हणाला आहे.
त्याचवेळी विराट कोहलीनेही भारतीय जवानांना कडक सॅल्यूट केला आहे. पाकिस्तानने जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला होता. पण, भारतीय संरक्षण यंत्रणेने तो हाणून पाडला. भारताच्या या हल्ल्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची स्थळ उद्ध्वस्त केली. त्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानकडून गुरुवारी रात्री भारताच्या सीमाभागात हल्ले झाले आणि भारतीय सैन्याने त्याला तसेच उत्तर दिले.
रोहितने ट्विट केले की, ‘प्रत्येक क्षणाबरोबर, घेतलेल्या प्रत्येक निर्णयाबरोबर मला आपल्या भारतीय सैन्याचा, भारतीय वायुसेनेचा आणि भारतीय नौदलाचा खूप अभिमान वाटतो. आपले योद्धे आपल्या राष्ट्राच्या अभिमानासाठी उभे आहेत. प्रत्येक भारतीयाने जबाबदार राहणे आणि कोणत्याही खोट्या बातम्या पसरवणे किंवा त्यावर विश्वास ठेवणे टाळणे महत्वाचे आहे. सर्वांनी सुरक्षित रहा!’ विराट कोहलीने इंस्टाग्रामवर लिहिले की, या कठीण काळात आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी आपल्या सशस्त्र दलांसोबत आम्ही एकजुटीने उभे आहोत आणि त्यांना सलाम करतो. आपल्या महान राष्ट्रासाठी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या बलिदानाबद्दल आणि त्यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल आम्ही त्यांच्या वीरांचे कायमचे ऋणी आहोत.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशात तणाव वाढला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून जोरदार उत्तर दिले जात आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याकडून प्रथम ७ मे रोजी ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर ८ मे च्या रात्री पाकिस्तानचे रावळपिंडी स्टेडियम उध्वस्त करण्यात आले आहे. या दरम्यान त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२५ ची पाकिस्तान सुपर लीग यूएईमध्ये हलवण्यात आले आहे. या पाठोपाठ आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. भारतात सुरू असलेली आयपीएल २०२५ बीसीसीआयकडून स्थगित करण्यात आली आहे.