कोलकाता : आयपीएलमध्ये काल कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यात मॅच पार पडली. कोलकाता नाईट रायडर्सनं एका रननं ही मॅच जिंकली. हर्षित राणाच्या (Harshit Rana) ओव्हरमध्ये विराट कोहलीला (Virat Kohli ) बाद देण्यात आलं. या निर्णयाला विराटनं आव्हान दिलं होतं, मात्र थर्ड अम्पायरनं पंचांचा निर्णय कायम ठेवला. यानंतर विराट कोहलीनं मैदानावरील पंचांसोबत वाद घातला होता.
मॅच फीसच्या 50 टक्के रकमेचा दंड
विराट कोहलीला या प्रकरणी मॅच फीसच्या 50 टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. विराट कोहलीनं अम्पायरसोबत वाद घातला हे चुकीचं असल्याचं माजी क्रिकेटपटू इरफान पठाणनं म्हटलं होतं. मात्र, मोहम्मद कैफ विराट कोहलीच्या बाजूनं उभा राहिला आहे. मोहम्मद कैफ आयपीएलमधील अम्पायरिंगवर प्रश्न उपस्थित केले आहेत. याशिवाय एक व्हिडीओ जारी करुन विराटला पाठिंबा देत हर्षित राणाला विराट कोहलीची माफी मागण्याचा सल्ला दिलाल आहे.
मोहम्मद कैफ भडकला
विराट कोहलीच्या नो-बॉल वादावर मोहम्मद कैफनं दोन पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केल्या आहेत.यामध्ये एका पोस्टमध्ये व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यानं म्हटलंय की एका बॉलरकडे फलंदाजाला बाद करण्यासाठी एका बॉलवर 10 पर्याय उपलब्ध असतात. तुम्ही ज्यावेळी 6 बॉल टाकता त्यावेळी फलंदाजाला बाद करण्यासाठी 60 संधी असतात. आऊट ऑफ मोडच्या नियमांचं पुस्तक पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल तुम्ही फलंदाजाला एका बॉलवर 10 वेळा बाद करु शकता.
मोहम्म्द कैफ म्हणाला, विराट कोहली आता आऊट झाला आहे. त्याला बीमरवर आऊट दिलं गेलं आहे, हा अतिशय खराब निर्णय आहे. बीमर तुम्ही कसा कंट्रोल करणार कारण तो बॉल टाकणं वैध नाही, त्या बॉलसाठी कोणताही खेळाडू तयार नसतो. विराट कोहलीला अम्पायरनं आऊट दिलं तो अतिशय खराब निर्णय होता.
Virat's decision yesterday was disappointing. Umpiring in general has been a let down in IPL 2024. #KKRvRCB #ViratKohli pic.twitter.com/Ng7SH4fENS
— Mohammad Kaif (@MohammadKaif) April 22, 2024
टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूनं हर्षित राणाला देखील खडे बोल सुनावले आहेत. कैफ म्हणाला की हर्षित राणानं विराट कोहलीची माफी मागितली पाहिजे. हर्षितनं माफी मागत हातातून बॉल सुटला म्हणत माफी मागायला हवी. कोहलीनं थोडं उंचावर खेळून कॅच दिला. फलंदाज नेहमी बॉल पिचिंग लाईनमध्ये पडून कुठं येतोय हे पाहत असतो. बीमर बॉलसाठी फलंदाज तयार नसतो. पंचांनी विराट कोहलीला बाद दिलं हा चुकीचा निर्णय होता, असं कैफ म्हणाला.
विराट कोहलीला कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील मॅचमध्ये आरसीबीच्या डावाच्या तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर बाद देण्यात आलं होतं. हर्षित राणानं कोहलीला फुल टॉस टाकला होता. विराटनं तो बॉल मारला आणि हर्षित राणानं कॅच घेतला. विराट कोहली त्यावेळी क्रीजच्या बाहेर असल्यानं तो बॉल नो दिला गेला नाही. या नियमावरुन वाद निर्माण झाला आहे.
आयसीसीचा नियम काय सांगतो?
आयसीसीच्या नियमानुसार, खेळाडूच्या कमरेच्या ऊंचीच्या वर बॉल असेल आणि तो जमिनीवर पडत नसेल तर नो बॉल मानला जातो. मात्र, त्यावेळी फलंदाज क्रीजमध्ये असणं आवश्यक असतं.