नोवाक जोकोविच आणि रॉजर फेडरर(फोटो-सोशल मीडिया)
Wimbledon 2025 : सर्बियन टेनिस स्टार नोवाक जोकोविचने आपली कमाल दाखवून आपले वर्चस्व सिद्ध केले आणि इटलीच्या फ्लेव्हियो कोबोलीचा ६-७(६), ६-२, ७-५, ६-४ असा पराभव केला. विजयासह जोकोविचने विम्बल्डन २०२५ च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ऑल इंग्लंड क्लबमध्ये जोकोविचची ही विक्रमी १४ वी उपांत्य फेरी ठरली आहे.
३८ वर्षीय सर्बियन खेळाडू जोकोविच आता विक्रमाची बरोबरी करून आठव्यांदा विम्बल्डन जेतेपद जिंकण्यासोबत एकूण ग्रँड स्लॅमची संख्या २५ पर्यंत पोहोचण्याच्या जवळ आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना अव्वल मानांकित जॅनिक सिन्नरशी होणार आहे. तर जेतेपदाच्या लढतीत त्याचा सामना कार्लोस अल्काराझ किंवा टेलर फ्रिट्झशी होण्याची शक्यता आहे.
सामन्यानंतर जोकोविचने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “माझ्या मनात अनेक आकडेवारी येत असून विम्बल्डन ही नेहमीच माझ्यासाठी खूप खास स्पर्धा राहिली आहे. ही स्पर्धा माझ्या कारकिर्दीचा एक मोठा भाग आहे आणि आजही ३८ व्या वर्षी देखील येथे खेळण्याची संधी मिळणे माझ्यासाठी मोठी सन्मानाची गोष्ट आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “आज कोबोलीसारख्या तरुण खेळाडूविरुद्ध खेळणे मला तरुण वाटायला लावणारे आहे. आता मी सिनरविरुद्ध खेळेन आणि हा एक उत्तम सामना असणार आहे.”
हेही वाचा : HCA प्रमुखांकडून ब्लॅकमेलिंग! SRH च्या मालकीण काव्या मारन यांची तक्रार; बड्या अधिकाऱ्यांना अटक
२२ व्या मानांकित फ्लेव्हियो कोबोलीने पहिल्या सेटमध्ये शानदार पुनरागमन करताना दिसला. ३-५ ने पिछाडीवर पडल्यानंतर जोरदार शॉट्स मारले आणि टायब्रेकमध्ये पहिला सेट ७-६ (६) ने आपल्या खिशात टाकला. रोमा संघाचा माजी फुटबॉल खेळाडू कोबोलीने नंतर टेनिसला आपले करिअर म्हणून निवडले आणि आज तो त्याच्या जोकोविचविरुद्ध कोर्टवर ठाम राहिला आणि लढला.
जोकोविचने दुसऱ्या सेटमध्ये आपला अनुभव पणाला लावला आणि कोबोलीच्या चुकांचा फायदा घेऊन सेट ६-२ असा जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये ६-५ अशी आघाडी घेतल्यानंतर त्याने सामन्यावरील आपली पकड अधिक मजबूत केली.
हेही वाचा : IND Vs ENG : ‘युवा संघाची इंग्लंडमध्ये जिंकण्याची क्षमता..’, ‘या’ माजी दिग्गज खेळाडूकडून गिल सेनेचे कौतुक
चौथ्या सेटमध्ये सूर्यास्ताच्या प्रकाशात जोकोविचला ब्रेक पॉइंटचा फायदा मिळाला. परंतु संधी गमावल्यानंतर तो रागाच्या भरात स्वतःच्या बुटाने रॅकेट मारताना दिसून आला. तथापि, शेवटच्या क्षणी कोर्टवर घसरून देखील त्याने शानदार पुनरागमन केले आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.या विजयासह, नोवाक जोकोविचने दिग्गज रॉजर फेडररच्या विम्बल्डन उपांत्य फेरीच्या विक्रमाला मागे टाकत त्याच्या ५२ व्या ग्रँड स्लॅम उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.