सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : भारत फोर्ज लि.च्या एअरोस्पेस विभागाने पुण्यातील मुंढवा येथे अत्याधुनिक लँडिंग गिअर घटकांच्या मशिनिंगसाठीचे नवे केंद्र सुरू केले आहे. हे केंद्र लिब्हेर एअरोस्पेस अॅंड ट्रान्सपोर्टेशन एसएएस या कंपनीच्या सहकार्याने उभारण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे भारत फोर्ज ही भारतातील अशा प्रकारची ओईएम-मान्यताप्राप्त लँडिंग गिअर घटकांची मशिनिंग सुविधा चालवणाऱ्या पहिल्या कंपन्यांपैकी एक ठरली आहे.
मोठ्या प्रमाणावर अशी क्षमता उभारणाऱ्या कंपन्यांमध्येही तिचा समावेश होतो. या नव्या केंद्रात अत्यंत अचूकतेने लँडिंग गिअरचे भाग तयार करण्यासाठी प्रगत मशिनिंग यंत्रे बसवण्यात आली आहेत. यांमुळे भारतातील एअरोस्पेस उत्पादन क्षेत्र अधिक मजबूत होण्यास मदत होणार असून, जागतिक एअरोस्पेस पुरवठा साखळीत भारताची भूमिका आणखी बळकट होण्याची अपेक्षा आहे.
या उद्घाटन समारंभाला लिब्हेर एअरोस्पेस अँड ट्रान्सपोर्टेशन एसएएसचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये ‘लिब्हेर एअरोस्पेस अॅंड ट्रान्सपोर्टेशन एसएएस’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन वॅंडेल, लिब्हेर एअरोस्पेस लिंडेनबर्ग जीएमबीएच या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक फिलिप वॉल्टर, ‘लिब्हेर एअरोस्पेस अॅंड ट्रान्सपोर्टेशन एसएएस’मधील खरेदी विभागाचे संचालक बर्न्ड शाशरल, तसेच ‘लिब्हेर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक संजय प्रसाद आणि सुनील कालरा यांचा समावेश होता. ‘भारत फोर्ज लिमिटेड’तर्फे या कार्यक्रमाचे नेतृत्व कंपनीचे व्हाइस चेअरमन व जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर अमित कल्याणी आणि भारत फोर्ज एअरोस्पेस विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरू बिस्वाल यांनी केले.
उद्घाटन कार्यक्रमात ‘भारत फोर्ज’चे व्हाइस चेअरमन व जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर अमित कल्याणी म्हणाले, “लिब्हेर एअरोस्पेसच्या सहकार्याने उभारलेले हे अत्याधुनिक केंद्र भारत फोर्जच्या एअरोस्पेस क्षेत्रातील प्रवासामधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या केंद्रामुळे आमचे ग्राहकांशी असलेले संबंध अधिक बळकट होतील आणि आम्ही त्यांना अधिक चांगली सेवा देऊ शकू. जागतिक गरजांसाठी महत्त्वाचे कॉम्पोनन्ट्स आणि उत्पादने तयार करण्याची जबाबदारी आमच्यावर टाकून ‘लिब्हेर एअरोस्पेस’ने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आज केवळ एका नव्या केंद्राचे उद्घाटन होत नाही, तर आमची क्षमता आणि कामाचा विस्तार वाढवण्याचा आमचा निर्धारही यातून दिसतो. अशा भागीदारीतून भारतीय उत्पादन उद्योगासाठी मजबूत पाया तयार होईल आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या विकासाला चालना मिळेल.”
‘भारत फोर्ज’कडे आता एअरोस्पेस उत्पादनाची संपूर्ण क्षमता उपलब्ध झाली आहे. ही कंपनी नागरी आणि लष्करी विमानांसाठी एअरो-इंजिनाचे सुटे भाग, विमानाच्या संरचनेचे घटक आणि लँडिंग गिअरचे उपघटक तयार करते. टर्बाइन आणि कॉम्प्रेसरचे भाग, फोर्ज्ड रिंग्स, शाफ्ट्स आणि डिस्क्स, तसेच विमानाच्या संरचनेशी आणि लँडिंग गिअरशी संबंधित विविध घटकही कंपनी तयार करते. याशिवाय, एअरो-इंजिन प्रकल्पांसाठी उच्च मूल्याच्या फोर्ज्ड रिंग्स तयार करण्याकरीता भारतात अत्याधुनिक एअरोस्पेस रिंग-मिल उभारण्याचे कामही कंपनी करीत आहे.
‘लिब्हेर एअरोस्पेस अँड ट्रान्सपोर्टेशन एसएएस’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन वॅंडेल म्हणाले, “भारत फोर्जसारख्या मजबूत आणि तंत्रज्ञानात पुढे असलेल्या कंपनीसोबत ही भागीदारी सुरू करताना आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो. जागतिक एअरोस्पेस उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही एक अत्याधुनिक सुविधा एकत्र उभारीत आहोत. ही भागीदारी आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. यामुळे जगभरातील आमच्या ग्राहकांसाठी नवकल्पना आणि दर्जेदार काम अधिक पुढे नेण्यास मदत होईल.”
या संयुक्त क्षमतेमुळे एअरोस्पेस उद्योगाच्या पुरवठा साखळीत ‘भारत फोर्ज एअरोस्पेस’ची भूमिका अधिक बळकट होत आहे. तसेच एअरोस्पेस क्षेत्रातील भारताचे वाढते योगदानही यातून दिसून येते.






