संग्रहित फोटो
पुणे : पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी १८ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. स्पष्ट बहुमत असल्याने या दोन्ही पदांवर राष्ट्रवादीचाच दावा मजबूत मानला जात असून, अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक पुढे सरसावल्याने पक्षांतर्गत चुरस वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ सदस्यांच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे ५१ सदस्य असल्याने पक्षाला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे महायुतीतील इतर पक्षांना सत्तेत सहभागी करून घेण्याची गरज नसल्याची भूमिका पक्षाने घेतली असून, स्वबळावर सत्ता स्थापण्याचा निर्णय झाला आहे. परिणामी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतील इच्छुकांची चुरस वाढली आहे.
अध्यक्षपदासाठी दौंड तालुक्यातील तीन टर्म सदस्य वीरधवल जगदाळे यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर बारामतीचे करण खलाटे, मुळशीतील ज्येष्ठ सदस्य शांताराम इंगवले, भोर तालुक्यातील विक्रम खुटवड तसेच आंबेगावचे माजी उपाध्यक्ष आणि दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांच्या नावांचाही उल्लेख होत आहे.
दरम्यान, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी आपले चिरंजीव तुषार थोरात यांच्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी अजित पवार गटाचा राजीनामा देत शरद पवार गटात प्रवेश केला होता. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आता आपल्या मुलासाठी आमदार आणि जिल्हा बँकेच्या संचालकांकडून पाठिंब्याची पत्रे मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याने राष्ट्रवादीत त्याबाबत चर्चा आणि काहीशी नाराजी व्यक्त होत असल्याचे सांगितले जाते.
आमदारांकडून विशेष पुढाकार नाही
पुणे जिल्ह्यातील काही आमदार आपल्या मतदारसंघातील सदस्यांना जिल्हा परिषदेत पदाधिकारी होण्याची संधी मिळावी, याबाबत फारसे उत्सुक नसल्याचीही चर्चा आहे. इंदापूरमध्ये गटनेतेपद मिळाल्यानंतर तेथून आणखी पद मिळणार का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मावळ तालुक्यातील सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे असतानाही तेथील आमदारांकडून पदासाठी विशेष पुढाकार घेतला जात नसल्याचे सांगितले जाते. भोर, वेल्हा, मुळशी तसेच शिरूर-हवेली तालुक्यांमध्येही अशीच परिस्थिती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हे सुद्धा वाचा : सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीचा दबदबा; पुणे जिल्ह्यातील 10 पंचायत समित्या ताब्यात
पुणे ‘झेडपी’त राष्ट्रवादीचा ‘जुनाच पॅटर्न
पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा गटनेता आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद वेगवेगळ्या नेत्यांकडे देण्याचा जुना पॅटर्न पुढे आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी गटातून निवडून आलेले श्रीमंत ढोले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाल्याची घोषणा केली आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर श्रीमंत ढोले यांचे पक्षातील सहकाऱ्यांनी अभिनंदन केले. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे सत्तास्थापनेची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.






