2030 पर्यंत 50 लाख भारतीय तरुणांना AI (Photo Credit - X)
AI आणि नव्या तंत्रज्ञानाचे शिक्षण वाढवणार
या उपक्रमांतर्गत IBM शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक तसेच कौशल्य प्रशिक्षण संस्थांमध्ये एआय आणि नव्या तंत्रज्ञानाचे शिक्षण वाढवणार आहे. यासोबतच All India Council for Technical Education (AICTE) सारख्या संस्थांसोबत सहकार्य करून प्रत्यक्ष अनुभवावर आधारित एआय शिक्षण, प्राध्यापक प्रशिक्षण, अभ्यासक्रमात सुधारणा, हॅकाथॉन आणि इंटर्नशिप्स आयोजित केल्या जातील.
IBM चे चेअरमन, प्रेसिडेंट आणि सीईओ अरविंद कृष्णा म्हणाले,“एआय आणि क्वांटम क्षेत्रात जगात आघाडी मिळवण्याची क्षमता आणि महत्त्वाकांक्षा भारताकडे आहे. या प्रगत तंत्रज्ञानातील कौशल्ये आर्थिक स्पर्धा, वैज्ञानिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तन ठरवतील. 50 लाख लोकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याची आमची वचनबद्धता ही भविष्यातील गुंतवणूक आहे. प्रगत कौशल्यांपर्यंत सर्वांना समान संधी उपलब्ध करून देऊन आम्ही युवकांना आणि विद्यार्थ्यांना नवकल्पना करण्यास, नवनवीन शोध लावण्यास आणि भारताच्या विकासाला गती देण्यास सक्षम करत आहोत.”
IBM शालेय स्तरावरही तयारी मजबूत करण्याचे काम सुरू ठेवत आहे. यासाठी त्यांनी वरिष्ठ माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी एआय अभ्यासक्रम तयार केला आहे आणि शिक्षकांसाठी AI Project Cookbook,Teacher Handbook आणि स्पष्टीकरणात्मक मॉड्यूल्स यांसारखी साधने उपलब्ध करून दिली आहेत. या कार्यक्रमांचा उद्देश लहान वयातच संगणकीय विचारसरणी आणि जबाबदार एआय तत्त्वे शिकवणे, तसेच शिक्षकांना आत्मविश्वासाने आणि मोठ्या प्रमाणावर एआय शिक्षण देण्यासाठी सक्षम करणे हा आहे.
IBM SkillsBuild या उपक्रमाचा मुख्य भाग आहे. हे जगातील सर्वात सोप्या पद्धतीने उपलब्ध होणारे तंत्रज्ञान शिक्षणाचे व्यासपीठ आहे. या कार्यक्रमात एआय, सायबरसिक्युरिटी, क्वांटम, क्लाउड, डेटा, सस्टेनेबिलिटी आणि कामासाठी आवश्यक कौशल्यांसह 1,000 हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. जे विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि संस्थांसाठी उपयुक्त आहेत. जगभरात 1.6 कोटींहून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला आहे. SkillsBuild हा 2030 पर्यंत जगभरात 3 कोटी लोकांना प्रशिक्षण देण्याच्या IBMच्या उद्दिष्टातील महत्त्वाचा भाग आहे, ज्यात भारताची भूमिका खूप महत्त्वाची आहे.






