Google चा Chrome विकला जाणार? खरेदी करण्यासाठी या दोन कंपन्या आल्या समोर! नेमकं काय आहे प्रकरण? सविस्तर जाणून घ्या
टेक जायंट कंपनी असलेल्या गुगल क्रोमचा वेब ब्राऊझर क्रोम सध्या अडचणीत सापडला आहे. क्रोमबाबत अनेक दावे – प्रतिदावे केले जात आहेत. शिवाय हा वेब ब्राऊझर लवकरच विकला जाणार असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र वेब ब्राऊझर क्रोमच्या विक्रीबाबत अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच खरेदीदारांची रांग लागली आहे. दिग्गज टेक कंपन्या वेब ब्राऊझर क्रोमची खरेदी करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या कंपन्यांमध्ये ओपनएआय आणि याहू यांचा समावेश आहे.
गुगल सध्या अमेरिकेच्या न्याय विभागासोबत एका मोठ्या खटल्याचा सामना करत आहे, ज्यामध्ये सर्च इंजिन मार्केटमध्ये त्यांची मक्तेदारी असल्याचा आरोप आहे. जर न्यायालयाने गुगलला दोषी ठरवले तर त्याला त्याचा प्रसिद्ध वेब ब्राउझर क्रोम विकण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. ही परिस्थिती पाहून आता अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी क्रोम खरेदी करण्यासाठी तयारी दाखवली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर गुगलला क्रोम विकावे लागले तर याहूने हे ब्राउझर खरेदी करण्याची तयार दर्शवली आहे. याबाबत याहूचे वरिष्ठ कार्यकारी आणि याहू सर्चचे जनरल मॅनेजर ब्रायन प्रोव्होस्ट यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की क्रोम ब्राउझरची किंमत अब्जावधी डॉलर्स असू शकते, परंतु याहूची मूळ कंपनी अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट या करारासाठी आवश्यक निधी उभारू शकते.
क्रोम खरेदी करण्याची तयारी दाखवणारी याहू एकमेव कंपनी नाही. तर ओपनएआय आणि पर्प्लेक्सिटी सारख्या कंपन्यांनीही क्रोम खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याच वेळी, डकडकगोलाही न्यायालयात हजर राहावे लागले, परंतु त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्याकडे इतक्या मोठ्या व्यवहारासाठी पैसे नाहीत.
अमेरिकन सरकारचा आरोप आहे की गुगलने ऑनलाइन सर्च आणि जाहिरात तंत्रज्ञानात बेकायदेशीरपणे इतके वर्चस्व मिळवले आहे की इतर कंपन्यांना बाजारात टिकून राहणे कठीण झाले आहे. आता न्यायालय गुगलचे हे वर्चस्व कसे मोडायचे यासाठी प्रयत्न करत आहे. जर न्यायालयाने क्रोम विकण्याचा आदेश दिला तर ओपनएआय ते खरेदी करू इच्छिते.
निक टर्ली यांनी त्यांच्या साक्षीत स्पष्टपणे म्हटले की, ‘जर गुगलला क्रोम विकावे लागले तर आम्ही ते खरेदी करण्यास तयार आहोत.’ क्रोम हा आज जगात सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राउझर आहे. आकडेवारीनुसार, सुमारे 64 टक्के लोक क्रोम वापरतात. दुसऱ्या क्रमांकावर अॅपलची सफारी आहे, जी सुमारे 21 टक्के लोक वापरतात.
गुगलने हे दावे पूर्णपणे नाकारले आहेत आणि म्हटले आहे की क्रोम विक्रीसाठी नाही. कंपनीला न्यायालयाने हा खटला रद्द करावा अशी इच्छा आहे. गुगलच्या नियामक प्रमुख ली-अॅन मुलहोलँड यांनी एका निवेदनात म्हटले आहे की सरकारच्या कृतींमुळे “अमेरिकन ग्राहक आणि तंत्रज्ञान नेतृत्वाला” नुकसान होईल.
गुगलविरुद्धचा हा खटला ‘तीन आठवडे’ चालेल आणि मेटा, अमेझॉन, अॅपल सारख्या इतर टेक कंपन्याही त्यावर लक्ष ठेवून आहेत. कारण अमेरिकन सरकारनेही त्याच्याविरुद्ध ‘मक्तेदारी’ बद्दल खटला दाखल केला आहे.