फोटो सौजन्य - Social Media
तामिळनाडूतील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षण आणखी प्रभावी करण्याच्या दिशेने सॅमसंगने मोठे पाऊल टाकले आहे. भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने युनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडिया (UN GCNI) यांच्यासह ‘डिजिअरिवू – तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण’ हा नवा शिक्षण उपक्रम लाँच केला. या कार्यक्रमाचे उद्घाटन तामिळनाडू सरकारचे शालेय शिक्षण मंत्री डॉ. अनबिल महेश पोयमोझी यांच्या हस्ते करण्यात आले.
डिजिअरिवू उपक्रमांतर्गत कांचीपुरम आणि राणीपेट जिल्ह्यांतील 10 सरकारी शाळांची निवड करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात 3,000 हून अधिक विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळणार आहे. या उपक्रमाद्वारे सॅमसंग शाळांची पायाभूत सुविधा सुधारेल, डिजिटल आणि एसटीईएम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित) शिक्षण अधिक मजबूत करेल आणि शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानावर प्रशिक्षण देईल.
सॅमसंगच्या या नव्या प्रयत्नात शाळांमधील शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
यात ‘बिल्डिंग अॅज लर्निंग एड’ (BALA) या संकल्पनेवर आधारित इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन केले जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात पाहून शिकण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल कौशल्य वाढवण्यासाठी आवश्यक साहित्यही दिले जाणार आहे.
उपक्रमात एसटीईएम थीम्सवर आधारित क्रियाकलाप-आधारित शिक्षण, आधुनिक अध्यापन तंत्र, कार्यशाळा आणि शिक्षक प्रशिक्षण सत्रांचा समावेश आहे. सॅमसंगकडून स्पोर्ट्स किट्स, तसेच तामिळ, इंग्रजी आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके असलेली ग्रंथालये स्थापन केली जातील.
डिजिअरिवू उपक्रमांतर्गत बारावीतील विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्स सिरीज, शिक्षणतज्ञांचे सत्र, तसेच आरोग्य जागरूकता शिबिरे राबवली जाणार आहेत. शाळांमध्ये विविध महत्त्वाचे दिवस, उपक्रम आणि समारंभ समुदाय सदस्यांच्या सहभागाने साजरे केले जातील.
सॅमसंग चेन्नई प्लांटचे व्यवस्थापकीय संचालक एसएच यून म्हणाले, “तंत्रज्ञानाची उपलब्धता अधिकाधिक विद्यार्थ्यांना दिली, तर त्यांच्यासाठी संधींचे दार उघडते. डिजिअरिवूच्या माध्यमातून आम्ही डिजिटल शिक्षणाचे वातावरण तयार करत आहोत. यामुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासूवृत्ती वाढेल आणि ते भारताच्या वेगाने विकसित होत असलेल्या डिजिटल अर्थव्यवस्थेत सक्रिय सहभाग घेऊ शकतील.”
त्यांनी पुढे सांगितले की, कंपनी फक्त तंत्रज्ञान नव्हे तर शिक्षकांचे सक्षमीकरण आणि स्थानिक समुदायाचे विकास यातही योगदान देत आहे.
“पार्श्वभूमी काहीही असो, प्रत्येक मुलाला दर्जेदार डिजिटल शिक्षण मिळाले पाहिजे,” असे ते म्हणाले.
यूएन जीसीएनआयचे कार्यकारी संचालक रत्नेश झा म्हणाले, “डिजिअरिवू हा व्यवसाय आणि समाज एकत्र काम केल्यास कसा परिवर्तन घडू शकतो याचा उत्तम नमुना आहे. हा उपक्रम संयुक्त राष्ट्रांच्या ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स’ (SDGs) साध्य करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.”
डिजिअरिवू व्यतिरिक्त सॅमसंग Samsung Innovation Campus (SIC) कार्यक्रमाद्वारे तामिळनाडूमधील सुमारे 5,000 विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, IoT, बिग डेटा, कोडिंग आणि प्रोग्रामिंग यांसारख्या उच्च तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढण्यास मदत होत आहे.






