फोटो सौजन्य - Social Media
आजच्या डिजिटल युगात काम, खरेदी, मनोरंजन आणि समाज माध्यमांवरील संवादांसाठी जास्तीत जास्त व्यवहार ऑनलाइन केले जात आहेत. मात्र, या वाढत्या डिजिटल उपस्थितीमुळे घोटाळेबाजांसाठी संधी निर्माण झाली आहे. हे सायबर गुन्हेगार ग्राहकांची महत्त्वाची माहिती आणि आर्थिक गोपनीयता चोरण्यासाठी अत्याधुनिक पद्धतींचा वापर करत आहेत. या पार्श्वभूमीवर ११ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त व्हिसाने तुमच्या डिजिटल सुरक्षेसाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स सुचवल्या आहेत, ज्यांचा अवलंब करून तुम्ही ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित बनवू शकता.
तुमच्या स्मार्टफोन किंवा इतर डिजिटल डिव्हाइसेसची सुरक्षा वाढवण्यासाठी बायोमेट्रिक सुरक्षितता हा एक महत्त्वाचा उपाय आहे. फिंगरप्रिंट्स किंवा फेस रेकग्निशन यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने तुमचे डिव्हाइस अधिक सुरक्षित राहते. हे बायोमेट्रिक सुरक्षा पर्याय पारंपरिक पिन किंवा पासवर्डच्या तुलनेत जास्त विश्वासार्ह मानले जातात, विशेषतः डिजिटल पेमेंटच्या बाबतीत. याशिवाय, कार्ड टोकनायझेशन ही आणखी एक महत्त्वाची बाब आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑनलाइन व्यवहारांसाठी कार्ड टोकनायझेशन अनिवार्य केले आहे. यामुळे व्यवहार अधिक सुरक्षित होतात. आज जवळपास सर्व कार्ड्स टोकनाइज केले गेले आहेत. जर तुम्ही अजूनही हे केले नसेल, तर त्वरित टोकनायझेशन प्रक्रिया पूर्ण करा.
तुम्ही ज्या वेबसाइटवर ऑनलाइन व्यवहार करत आहात ती वेबसाइट विश्वसनीय आहे की नाही हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या वेबसाइटच्या URL मध्ये “https://” हा घटक नसतो, त्या वेबसाइटवर व्यवहार करणे धोकादायक ठरू शकते. अशा वेबसाइट्सवर संवेदनशील माहिती शेअर करू नका. अॅप्स डाऊनलोड करताना देखील अधिकृत अॅप स्टोअरचाच वापर करा. याशिवाय, प्रायव्हसी पॉलिसीज वाचणे अत्यंत गरजेचे आहे. प्रायव्हसी पॉलिसी वाचल्याने तुमच्या डेटाचा उपयोग कशाप्रकारे केला जातो हे समजते. कोणत्याही गोष्टींना होकार देण्यापूर्वी काळजीपूर्वक तपास करूनच निर्णय घ्या.
जर कधी तुमच्या सोबत सायबर फसवणूक झाली असेल तर त्वरित तुमच्या बँक किंवा पेमेंट प्रदात्याशी संपर्क साधा. तसेच नॅशनल सायबर क्राइम हेल्पलाइनच्या १९३० या क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवा. या टिप्सचा अवलंब केल्यास तुम्ही डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित बनवू शकता. सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त डिजिटल विश्वातील वाढत्या धोक्यांपासून सावध राहण्याची काळजी घ्या आणि सायबर सुरक्षिततेबाबत जागरूक व्हा.