आता WhatsApp आणि Messenger स्वत: देणार स्कॅम अलर्ट! कसं काम करणार नवीन फीचर, जाणून घ्या सविस्तर
टेक कंपनी Meta ने त्यांच्या युजर्सना ऑनलाईन स्कॅम आणि फ्रॉडपासून सुरक्षित ठेवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. कंपनीने युजर्सच्या सुरक्षेसाठी काही खास फीचर्स जारी केले आहेत. कंपनीने जारी केलेल्या या नवीन फीचरअंतर्गत युजर्ससाठी संबंधित स्कॅमपूर्वीच अलर्ट जारी केला जाणार आहे. यासोबतच Meta ने यूजर्सचे अकाऊंट सुरक्षित राहावे यासाठी देखील काही नवीन टूल्स आणि फीचर्स सादर केले आहेत.
Meta ने सांगितलं आहे की, कंपनीने अलीकडेच फेसबूक आणि इंस्टाग्रामवर म्यानमार, लाओस, कंबोडिया आणि यूएई सारख्या देशांमध्ये 80 लाखांहून अधिक स्कॅम नेटवर्क पकडले आहेत. हे स्कॅम्स प्रामुख्याने मेसेजिंग, डेटिंग अॅप्स, सोशल मीडिया आणि क्रिप्टो प्लेटफॉर्म्सद्वारे सुरु होते. याशिवाय कंपनीने 21,000 हून अधिक बनावट पेज आणि अकाऊंटवर देखील कारवाई केली आहे. हे पेज आणि अकाऊंट लोकांना कस्टमर सपोर्ट असल्याचे भासवून युजर्सकडून माहिती गोळा करत होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
Meta आता WhatsApp व्हिडीओ कॉल दरम्यान स्क्रीन शेयरिंग फीचरमध्ये एक नवीन सिक्योरिटी अलर्ट जोडणार आहे. जर एखाद्या युजरने कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत स्क्रिन शेअर केली, तर अॅपद्वारे त्या युजरला लगेचच अलर्ट जारी केला जाईल. या अलर्टमध्ये लिहीलं असेल की, “तुमची स्क्रीन फक्त तुमच्या विश्वासू लोकांसोबत शेअर करा, कारण यादरम्यान तुम्ही चुकून तुमचे बँक तपशील किंवा इतर संवेदनशील माहिती शेअर करू शकता.”
Meta ने सांगितवलं आहे की, “आम्हाला माहिती आहे की स्कॅमर्स सहसा युजर्सवर स्क्रीन शेअर करण्यासाठी दबाव टाकतात, जेणेकरून स्कॅमर्सना बँकिंग किंवा वेरिफिकेशन कोडसारखी वैयक्तिक माहिती मिळवण्यासाठी मदत होऊ शकेल. हे नवीन टूल यूजर्सना संशयास्पद हालचाली ओळखण्यास मदत करेल. जेणेकरून युजर्सची फसवणूक होणार नाही.”
Chhath Puja 2025: घरबसल्या तयार करा तुमचे आवडते फोटो, महागड्या DSLR चीही गरज नाही! फॉलो करा या टिप्स
Meta आता Messenger साठी देखील नवीन AI-आधारित स्कॅम डिटेक्शन सिस्टमची चाचणी करत आहे. जेव्हा ही प्रणाली सक्रिय केली जाते, तेव्हा चॅटमध्ये संभाव्य घोटाळा किंवा संशयास्पद संदेश आढळल्यास अॅप यूजर्सना तात्काळ अलर्ट देईल. याशिवाय यूजर्सना त्यांचे अलीकडील चॅट्स AI स्कॅम रिव्यूसाठी पाठवण्याचा पर्याय देखील दिला जाणार आहे. कंपनीने सांगितलं आहे की, जर यामध्ये काही स्कॅम किंवा घोटाळा आढळला तर युजर्सना सामान्य घोटाळ्याच्या पद्धतींबद्दल माहिती दिली जाईल आणि त्यांना ब्लॉक करणे किंवा तक्रार करणे यासारखे उपाय सुचवले जातील. हे नवीन फीचर Messenger साठी कधी जारी केले जाणार आहे, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. मात्र कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे युजर्सच्या सुरक्षेत आणखी वाढ होणार आहे.






