(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठमोळा रिल स्टार आणि लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम यांचं निधन झाल्याचे समोर आले आहे. प्रथमेशच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडिया विश्वात शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रथमेश आजारी होता. आज त्याच्या मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही दुःखद बातमी सर्वांना कळवली आहे. आणि या बातमीने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याने आणि त्याच्या आईने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांचे भरभरून मनोरंजन केलं आहे.
प्रथमेश कदम आणि त्याची आई प्रज्ञा कदम यांची माय-लेकाची जोडी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांचे रिल्स नेटकऱ्यांच्या विशेष पसंतीस उतरले होते. काही वर्षांपूर्वी प्रथमेशच्या वडिलांचं निधन झाले होते. त्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी प्रथमेशवर आली होती. घराची जबाबदारी सांभाळतानाच त्याने या दुःखातून सावरत आईलाही खंबीरपणे आधार दिला होता. आणि या दोघांचे एकमेकांवरचे प्रेम पाहून चाहते देखील त्याला पसंत करू लागले.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रथमेश आणि त्याची आई एकत्र रिल्स बनवत होते. त्यांच्या व्हिडीओंना केवळ प्रेक्षकांचाच नव्हे, तर अनेक मराठी कलाकारांचाही भरभरून प्रतिसाद मिळत होता. मात्र प्रथमेशच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्रथमेशचा जवळचा मित्र तन्मय पाटेकर याने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, “तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश. देवाघरी स्वतःची काळजी घे रे! खूप आठवण येईल तुझी… Miss You Bhai.” असे लिहून त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
प्रेमाच्या रेशमी धाग्यात गुंफली अभि–कृतिकाची केमिस्ट्री; ‘लग्नाचा शॉट’मधील ‘रेशमी बंध’ गाणं रिलीज
साधा, प्रेमळ स्वभाव आणि नृत्यकलेमुळे प्रथमेशने अल्पावधीतच लाखो चाहत्यांची मनं जिंकली होती. आधी पती आणि आता मुलाचं छत्र हरपल्याने प्रथमेशच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण काळात प्रथमेशचे मित्र, चाहते आणि संपूर्ण सोशल मीडिया विश्व त्याच्या आईच्या दुःखात सहभागी आहेत. प्रथमेशने आता अखेरचा श्वास घेऊन चाहत्यांचा आणि कुटुंबाचा निरोप घेतला आहे, परंतु चाहत्यांच्या मनात त्याच्या आठवणी नेहमीच जिवंत राहणार आहे.






