लहान मुलांना iPhone द्यावा की Android? पालकांमध्ये सर्वात मोठा गोंधळ, अशी करा योग्य पर्यायाची निवड
स्मार्टफोन प्रत्येकाच्या जिवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण स्मार्टफोनचा वापर करतो. हल्ली तर शाळेतील अभ्यास पूर्ण करण्यासाठी देखील लहान मुलांना स्मार्टफोनची गरज असते. प्रत्येक व्यक्तिची फोनची गरज वेगळी असते. काही लोकं त्यांच्या बजेटनुसार स्मार्टफोन खरेदी करतात तर काही लोकं कूल लूक आणि स्टाईलसाठी महागडा स्मार्टफोन खरेदी करतात. आपल्यासाठी एक परफेक्ट स्मार्टफोन खरेदी करणं फार मोठं टास्क असतं. यापेक्षा मोठं टास्क म्हणजे आपल्या मुलांसाठी स्मार्टफोन खरेदी करणं.
आपल्या मुलांना कोणता स्मार्टफोन द्यावा, यासाठी पालकांमध्ये नेहमीच गोंधळ असतो. मुलांना आयफोन द्यावा की अँड्रॉईड, यामध्ये पालकं नेहमीच गोंधळलेले असतात. आपल्या मुलाच्या सुरक्षिततेबद्दल, शिक्षणाबद्दल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापराबद्दल चिंतित असलेल्या प्रत्येक पालकाच्या मनात हा प्रश्न येतो. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर या लेखात देण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
प्रायव्हसी आणि सिक्योरिटीच्या बाबतीत आयफोन टॉप लेव्हलवर आहे. अॅपलच्या iOS सिस्टममध्ये अनेक फीचर्स आहेत, जसे Screen Time Monitoring, App Access Control, आणि Location Sharing, याच्या मदतीने अगदी सोप्या पालक कंट्रोल करू शकतात. पण या फोनची किंमत 70,000 रुपये किंवा त्याहून अधिक असते. ज्यामुळे हा फोन प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसतो. पण काही पालक हा फोन मुलांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी केलेली गुंतवणूक मानतात.
Android स्मार्टफोन 8,000 रुपयांपासून खरेदी केला जाऊ शकतो. यामध्ये अनेक वेगवेगळे ब्रँड्स देखील उपलब्ध आहेत, जसे की Samsung, Realme, Xiaomi आणि Motorola. हे ब्रँड्स चांगले आणि स्वस्त ऑप्शन देतात. Android मध्ये कस्टमाइजेशनसाठी देखील अनेक पर्याय उपलब्ध असतात. मात्र यामुळे लहान मुलांसाठी धोका निर्माण होण्याची शक्यता देखील वाढते. गुगल प्ले स्टोअरवर असे अनेक अॅप्स आहेत, जे पालकांनी काळजी घेतली नाही तर मुलांची गोपनीयता आणि डिव्हाइस धोक्यात येऊ शकतात.
साइबर एक्सपर्ट्सचं असं म्हणणं आहे की, जर तुमचा मुलगा 14 वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल, तर त्याच्यासाठी एक लिमीटेड फीचरवाला अँड्रॉईड स्मार्टफोन खरेदी करा, ज्यामध्ये इंटरनेट आणि अॅप्स कंट्रोल उपलब्ध असणार आहे. यामुळे मुलांची सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी मदत होते. याशिवाय त्यांना ऑनलाईन धोक्यांपासून आणि सोशल मीडियाच्या आहारी जाण्यापासून वाचवले जाऊ शकते.
याशिवाय, जर तुमच्या मुलाचे वय 15 ते 18 वर्षांदरम्यान असेल आणि जर तो अभ्यासासाठी किंवा कंटेंट तयार करण्यासाठी फोन वापरत असेल तर त्याच्यासाठी iPhone एक योग्य निवड ठरू शकते. पण यासाठी बजेट असणं गरजेचं आहे. कारण अनेक पालक केवळ मुलांनी हट्ट केल्यामुळे आयफोन खरेदी करून देतात. बऱ्याचदा मुले त्यांच्या पालकांकडे आयफोन मागतात, जर फोन घेऊन दिला नाही तर ब्लॅकमेल देखील करतात. मुलांचे हट्ट पुरवण्यासाठी पालक त्यांना आयफोन खरेदी करून देतात. परंतु पालकांनी हे समजून घेतले पाहिजे की तंत्रज्ञान हा केवळ एक ट्रेंड नाही तर ती एक जबाबदारी देखील आहे.