मेट्रोच्या कामाच्या विलंबावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक उफाळून आली आहे. काल परिवहनमंत्री आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मेट्रो कामांची पाहणी करताना भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर कामाला अडथळे आणल्याचा आरोप केला होता. याला प्रत्युत्तर देताना आज आमदार महेता यांनी पत्रकार परिषद घेत परिवहन मंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला.महेता यांनी आरोप केला की, “सरनाईक केवळ जबाबदारी झटकण्यासाठी इतरांवर आरोप करत आहेत. मेट्रो कामात होत असलेला विलंब हा प्रशासनाच्या गलथान कारभाराचा परिणाम आहे. आम्ही जनतेच्या बाजूने उभे आहोत आणि विकासकामांना कोणताही अडथळा येऊ देणार नाही.”सरनाईक यांनी कालच्या पाहणी दौऱ्यात मेट्रो प्रकल्पाच्या संथ गतीसाठी भाजप स्थानिक नेत्यांना जबाबदार धरले होते. “पुनर्वसनाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करून भाजप नेते काम थांबवत आहेत,” असा आरोप त्यांनी केला होता.दरम्यान, या प्रकरणामुळे मेट्रो प्रकल्पाभोवती राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विकासकामांच्या गतीवर याचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.