मुंबई : जीवनात कधीही पोलीस स्टेशनची पायरी देखील चढायची वेळ येऊ नये अशी इच्छा सर्वसामान्य माणसाची असते. परंतु वाशिम येथील एका प्रेमी युगुलाने थेट पोलीस स्टेशनमध्येच सात फेरे घेत आपल्या विवाहित आयुष्याला सुरुवात केली. दररोज गुन्ह्यांची नोंद होणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये ‘शुभमंगल सावधान’ चे सूर उमटले.
तर घडलं असं की, वाशीम मधील तरुण तरुणीचं एकमेकांवर प्रेम जडलं. मुलाचे वय होते २३ तर मुलीचं होत २१. दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करून आयुष्यएकमेकांसोबत काढायच होत. परंतु दोघांच्याही कुटुंबाकडून या लग्नाला विरोध होता. मग काय या लैला मजनूनं थेट वाशिम (Washim) येथील शिरपूर पोलीस स्टेशनचं गाठलं. पोलिसांसमोर जाऊन या प्रेमी युगुलाने आपलया प्रेमाची कबुली दिली. आमचे एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही लग्न करु इच्छितो. पण दोघांच्याही कुटुंबीयांकडून लग्नाला विरोध आहे, असे सांगत आम्ही काय करायचं? असा अप्रत्यक्ष सवालच त्यांनी पोलिसांना विचारला. पोलिसांनीही त्यांची अडचण समजून घेतली. सर्व कायदेशीर बाबी तपासल्या. दोघेही सज्ञान असून विवाहासाठी एकमेकांना पूरक आहेत याची खातरजमा करुन घेतली आणि पोलीस स्टेशनमध्येच दोघांच्या लग्नाचा बार उडवून टाकला. सोबतच दोघांच्याही कुटुंबीयांकडून या नवदाम्पत्याला कोणताही त्रास होणार नाही याचीही खात्री करुन घेतली. पोलिसांच्या सहकार्यामुळे सुरु झालेल्या नव्या सहजीवनात वाटचाल करण्यासाठी हे नवदाम्पत्य आनंदाने मार्गस्त झाले.
पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या या हटके विवाहाची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. ‘मियां बीबी राजी तो क्या करेगा काजी’ असे म्हणत पालकांनीही आता या दोघांसमोर हात टेकले आहेत. या नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्याव्यतिरिक्त त्यांच्याही हातात काही उरले नाही. विशेष म्हणजे, मुलीच्या वडीलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार खामगाव पोलीस ठाण्यात दिली होती. पण, हे जोडपे पोहोचले सिव्हील लाईन्स पोलीसांमध्ये. पोलिसांनीही खामगाव पोलिसांना तशी माहिती देत पुढील कार्यवाही केली.