ड्रॅगनचा युद्धसज्ज संदेश! चीनच्या 'DF-100' सुपरसॉनिकच्या प्रदर्शनाने जगभरात खळबळ; अमेरिकेला थेट इशारा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
DF-100 missile : चीनने पहिल्यांदाच आपल्या रहस्यमय ‘DF-100’ सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचा दुर्मिळ व्हिडिओ जाहीर केला असून, जगभरातील संरक्षण तज्ज्ञांचे लक्ष या घडामोडीकडे वेधले गेले आहे. अमेरिकन युद्धनौका, पॅसिफिकमधील अमेरिकन लष्करी तळ आणि आशियातील महत्त्वाच्या भागांवर थेट धोका निर्माण करणारे हे क्षेपणास्त्र आता अधिकृतपणे जगासमोर आले आहे.
पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (PLA) माहितीपटाच्या शेवटच्या भागात दोन मिनिटांचा हा व्हिडिओ दाखवण्यात आला. याआधी २०१९ मध्ये फक्त दोन सेकंदांचे अधिकृत फुटेज प्रदर्शित झाले होते, तेही काही काळानंतर काढून टाकण्यात आले. त्यामुळे या क्षेपणास्त्राच्या अचूक वैशिष्ट्यांबाबत फारशी माहिती उपलब्ध नव्हती. मात्र आता नव्या व्हिडिओमुळे त्याचा वेग, ताकद आणि कार्यक्षमता स्पष्ट झाली आहे.
DF-100 हे जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्र असून, २०१९ मधील चीनच्या ७०व्या राष्ट्रीय वर्धापन दिनाच्या भव्य परेडमध्ये पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या प्रक्षेपण कॅनिस्टरवर ‘DF-100’ असे लिहिले असले तरी उद्घोषकांनी त्याला ‘CJ-100’ असे संबोधले होते. चीनमध्ये ‘DF’ (डोंग फेंग) ही संज्ञा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठी आणि ‘CJ’ (चांग जियान) ही संज्ञा क्रूझ क्षेपणास्त्रांसाठी वापरली जाते. या गोंधळामुळे तज्ज्ञांमध्ये याबाबत बरीच चर्चा झाली होती.
BREAKING; CHINA releases rare footage of DF-100 cruise missile to deter US Incase of war!! pic.twitter.com/AlsuIIMtqp
— Recon & surveillance (@Recon_surv) August 11, 2025
credit : social media
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अजब शोध! पृथ्वीखाली दडलेल्या जीवसृष्टीचे सापडले पुरावे, चिनी- कॅनेडियन शास्त्रज्ञांचा अनोखा दावा
चीनने २०२४ मधील झुहाई एअर शोमध्ये DF-100 ची वैशिष्ट्ये उघड केली. या क्षेपणास्त्राची प्रहार श्रेणी ३,००० ते ४,००० किमी आहे, म्हणजेच ते चीनच्या मुख्य भूमीपासून खूप दूरपर्यंत लक्ष्य भेदू शकते. मॅक ४ च्या क्रूझिंग वेगाने (ध्वनीच्या वेगाच्या चार पट) प्रवास करणारे हे क्षेपणास्त्र ४० मिनिटांत लक्ष्य गाठण्यास सक्षम आहे. याची अचूकता इतकी उच्च आहे की ते मजबूत संरचनांनाही सहज भेदू शकते.
DF-100 च्या प्रहार श्रेणीत तैवान, जपान, दक्षिण कोरिया तसेच ओकिनावा आणि ग्वाममधील अमेरिकेचे लष्करी तळ येतात. हे तळ अमेरिकेच्या पॅसिफिकमधील संरक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या क्षेपणास्त्रामुळे अमेरिकन विमानवाहू नौका, लष्करी मुख्यालये आणि लॉजिस्टिक्स केंद्रे थेट धोक्यात आली आहेत. तज्ज्ञांच्या मते, या शस्त्रामुळे अमेरिकेची ‘दुसरी बेट साखळी’ (Second Island Chain) पश्चिमेकडे सैन्य तैनात करण्याची क्षमता कमकुवत होऊ शकते.
पीपल्स लिबरेशन आर्मीचा 98 वा वर्धापन दिन, तसेच दुसऱ्या महायुद्धात जपानवरील विजयाच्या 80व्या वर्षानिमित्त हा माहितीपट चित्रित करण्यात आला आहे. 3 सप्टेंबर रोजी बीजिंगमध्ये भव्य लष्करी परेड आयोजित करण्यात येणार आहे, ज्यातून चीन आपल्या सामरिक क्षमतेचा जागतिक पातळीवर संदेश देऊ इच्छितो. त्यात DF-100 चा समावेश होणे, हे चीनच्या संरक्षण धोरणातील आक्रमकतेचे द्योतक मानले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : International Lefthanders Day 2025 : जगात सरासरी 12% लोक आहेत डावखुरे; जाणून घ्या यामागील रंजक कारण
लष्करी विश्लेषकांच्या मते, DF-100 केवळ वेग आणि श्रेणीतच प्रभावी नाही, तर त्याच्या सुपरसॉनिक क्षमतेमुळे ते अडवणेही अवघड आहे. त्यामुळेच अमेरिकेच्या संरक्षण तंत्रणेला या नव्या शस्त्रामुळे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. चीनच्या या हालचालीमुळे आशिया-पॅसिफिकमध्ये सामरिक स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिका आणि तिचे मित्रदेश आता या नव्या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी अधिक प्रगत तंत्रज्ञान आणि रणनीती शोधतील, यात शंका नाही.