(फोटो सौजन्य: Instagram)
जगभरात घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. प्रेम करणं महत्त्वाचं नसतं ते ते निभावताही आलं पाहिजे. मध्यातच तुटलेलं हे नातं एकमेकांपासून दूर करून व्यक्तीला आपल्या पार्टनरपासून मुक्त करत असलं तरी त्याचा खोल परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होत असतो. घटस्फोटानंतर अनेकजण नैराश्यात जातात आणि नको ती पाऊले उचलतात. सध्या अशीच एक भीषण आणि धक्कादायक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यात एका व्यक्तीने आपल्या घटस्फोटानंतर एक फार मोठे पाऊल उचलले. त्याच्या या कृतीने त्याचाच नाही तर इतर लोकांचाही जीव धोक्यात आणला आणि आता याच घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. यात नक्की काय घडून आलं ते आपण या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.
काय आहे प्रकरण?
माहितीनुसार, ही घटना दक्षिण कोरियातील सोल (Seol) मधली आहे. वास्तविक, घटनेत झालं असं की, ६७ वर्षीय पुरूषाने इथल्या चालू ट्रेनमध्ये आग लावली. ही घटना ३१ मे रोजी घडली आणि त्यात अनेक लोक जखमी झाले आणि मालमत्तेचे नुकसान झाले. व्यक्तीचा आपल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता ज्यामुळे नैराश्यात जाऊन त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते आहे. सोल दक्षिण जिल्हा अभियोक्ता कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, वॉनवर अनेक आरोप आहेत, ज्यात हत्येचा प्रयत्न, चालत्या ट्रेनमध्ये जाळपोळ आणि रेल्वे सुरक्षा कायद्याचे उल्लंघन यांचा समावेश आहे.
ही घटना सोल मेट्रो लाईन ५ वर येओनारू स्टेशन आणि मापो स्टेशन दरम्यान सकाळी ८:४२ वाजता घडली. यावेळी ट्रेन हान नदीखालील समुद्राखालील बोगद्यातून जात होती. योनहाप वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार , वॉनने सबवे डब्यात पेट्रोल ओतले आणि नंतर त्याचे कपडे पेटवून त्यात आग लावली. आता या आगीमुळे तब्बल २२ प्रवाशांना धुरामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर १२९ जणांवर घटनास्थळी उपचार करण्यात आले. संशयितालाही रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त आहे. द चोसुन डेली वृत्तानुसार , आगीमुळे अंदाजे ३३० दशलक्ष वॉन किमतीचे मालमत्तेचे नुकसान झाले आहे, ज्यामध्ये एका सबवे कारचे नुकसान देखील समाविष्ट आहे. घटस्फोटाच्या खटल्याच्या निकालामुळे निराश होऊन वॉनने हा गुन्हा केल्याचे तपासकर्त्यांनी सांगितले. ९ जून रोजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि सरकारी वकिलांच्या स्वाधीन केले.
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाल्या असून अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे, काय वेडा माणूस आहे हा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही गेल्या महिन्यात घडलेली घटना होती, पण यावेळी व्हिडिओ रिलीज झाल्यासारखे दिसते आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्याला हत्येच्या प्रयत्नाच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.