फोटो - सोशल मीडिया
दिल्ली : देशाचे नवीन संसद भवन मागील वर्षी बांधण्यात आले. हे संसदभवन पावसामुळे झालेल्या गळतीमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. मोदी सरकारकडून बांधण्यात आलेल्या या भवनामध्ये पाणी गळत असल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली. त्यानंतर आता संसद भवन परिसरामध्ये माकडं शिरल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर संसद भवन परिसरातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये खासदारांच्या लॉबीमध्ये माकडं उड्या मारताना दिसून आली आहेत.
संसदेत माकड घुसले कसे?
नवीन संसद भवनाच्या लॉबीमध्ये माकडं फिरत असल्याचे दिसून आले. खासदारांच्या कॉरिडॉरमध्ये आणि लॉबीत हे माकड फिरताना दिसले. याचा व्हिडिओ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र संसद भवनाच्या परिसरामध्ये हे माकड घुसले कसे? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. नवीन संसदेत जुन्या संसदेप्रमाणे खुले कॉरिडॉर नसल्यामुळे इमारतीच्या एका दरवाजामधून माकड आत गेलं असावं, असे सांगितले जात आहे.
Monkey Baat today in ModiMarriot, also known as the New Parliament Building pic.twitter.com/Xo47Rfj9jl
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) August 2, 2024
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी काढले बाहेर
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक माकड सोफ्यावर बसलेलं दिसत आहे. तसेच लॉबीमध्ये माकड उड्या मारतानाही दिसलं. तर त्याच लॉबीमध्ये काही लोक शेजारच्या सोफ्यावर बसलेलेही दिसले आहेत. यावेळी तेथे बसलेल्या एका व्यक्तीने या माकडाचा व्हिडिओ बनवला आणि व्हायरल केला. या माकडाने कोणतंही नुकसान केलं नसल्याचं सांगितलं जात आहे. संसदेच्या आवारात माकड फिरताना दिसल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढले.