प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांची राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुधा मूर्ती या राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार बनल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली. सुधा मूर्ती यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत महिला दिनी मोदींनी त्यांना या नियुक्तीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या दरम्यान प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे.
सुधा मूर्ती यांची राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती झाली असली तरी यापूर्वी त्यांनी राजकारणामध्ये येण्यास स्पष्ट नकार दिला होता. प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना राजकारणात येण्याची गरज नाही असे वक्तव्य केले होते. सोशल मीडियावर त्यांच्या विधानाची जोरदार चर्चा आता रंगली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सुधा मूर्ती यांनी संसद भवनाला भेट दिली होती. त्यावेळी, त्यांना खासदार होण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी, “खूपच सुंदर… अतिशय सुंदर… वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मला खूप वर्षांपासून संसदभवन पाहण्याची इच्छा होती. आज माझं ते स्वप्न सत्यात उतरल्याचं वाटत आहे. येथील संसद भवनातील कलाकूसर, संस्कृती आणि इतिहास सर्वकाही अतिशय सुंदर आहे,” असं म्हटलं होतं.
#WATCH | Delhi | As Sudha Murty visits the Parliament, she says, “It is so beautiful…No words to describe. I wanted to see this for a long time. It was a dream come true today. It is beautiful…It’s art, culture, Indian history – everything is beautiful…” pic.twitter.com/P2kKp2Wj2o
— ANI (@ANI) December 8, 2023
त्यावेळी, सुधा मूर्ती यांना खासदार बनून येथे येऊ इच्छिता का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर, मी जिथे आहे तिथे आनंदी आहे म्हणत त्यांनी हात जोडून नम्रपणे नकार दिला होता. मात्र, आता त्या खरंच खासदार बनून संसदेच्या सभागृहात जाणार आहेत. त्यांचा तो व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.