Russia Earthquake: रशियातील कुरिल बेटांवर 6.5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप; परिसरात भीतीचे वातावरण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Russia Earthquake : रशियाच्या सुदूर पूर्वेकडील कुरिल बेटांवर शुक्रवारी (१३ जून २०२५) सकाळी जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटर (EMSC) ने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.५ इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र जमिनीपासून केवळ १२ किलोमीटर खोल होते, त्यामुळे त्याचा प्रभावही तुलनेत तीव्र जाणवला.
भूकंप झाल्यानंतर स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून, संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर बचाव पथक सज्ज ठेवण्यात आले आहेत. या भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याची पुष्टी अधिकृतरीत्या करण्यात आलेली नाही. तथापि, भूकंपग्रस्त परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कुरिल बेटे हे रशियाच्या सखालिन प्रांतात स्थित असून, हे बेटे रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकापासून ते जपानच्या होक्काइडो बेटाच्या ईशान्य टोकापर्यंत पसरलेले आहेत. सुमारे ७५० मैल (१,२०० किलोमीटर) लांब असलेला हा द्वीपसमूह ओखोत्स्क समुद्राला पॅसिफिक महासागरापासून विभक्त करतो. या द्वीपसमूहात ५६ बेटे असून, ती एकूण १५,६०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेली आहेत. कुरिल बेटे पॅसिफिक महासागराच्या ‘रिंग ऑफ फायर’ म्हणजेच भूकंप आणि ज्वालामुखीच्या घनदाट पट्ट्यात येतात. त्यामुळे येथे अशा नैसर्गिक आपत्ती वारंवार घडत असतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War : ‘जो कोणी इस्रायलसोबत आहे तो आमचा निशाणा’, इराणचा अमेरिकेसह जगाला थेट इशारा; चीनचाही संताप
या भागात १०० पेक्षा अधिक ज्वालामुखी आढळतात, त्यापैकी किमान ३५ ज्वालामुखी अजूनही सक्रिय आहेत. तसेच, येथे अनेक गरम पाण्याचे झरे आढळतात. या सर्व कारणांमुळे कुरिल बेटे सतत भूकंप व ज्वालामुखी उद्रेकाच्या धोक्याखाली असतात. इतिहासातही या बेटांवर विनाशकारी भूकंपांची नोंद आहे. १७३७ साली येथे २१० फूट (६४ मीटर) उंचीच्या भरतीच्या लाटांनी तडाखा दिला होता, जी इतिहासातील सर्वात उंच सुनामी लाट मानली जाते.
कुरिल बेटांवर याआधीही भूकंप झालेले आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये येथे ६.६ तीव्रतेचा भूकंप झाला होता, तर २६ जानेवारी २०२५ रोजी कामचटका प्रदेशाजवळ ५.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला होता. तसेच, १९५२ मध्ये कुरिल बेटांवर ९ रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप झाला होता, जो ज्वालामुखी उद्रेकामुळे घडल्याचे मानले जाते.
भूकंप घडण्याचे मुख्य कारण म्हणजे जमिनीखाली असलेल्या टेक्टोनिक प्लेट्सचा परस्पर संघर्ष. या प्लेट्स एकमेकांवर आदळल्यामुळे निर्माण होणारी ऊर्जा जमिनीत कंपन निर्माण करते आणि त्यातून भूकंपाचे धक्के जाणवतात. कधीकधी अणुशस्त्रांच्या चाचण्यांमुळेही जमिनीवर कंपन निर्माण होतात, मात्र अशा कंपनांचा प्रभाव तुलनेत कमी असतो आणि ते फारसे हानिकारकही नसतात.
या भूकंपानंतर कुरिल बेटांवरील आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आहेत. सुनामीचा कोणताही धोका नसल्याचे संकेत यावेळी देण्यात आले असले, तरी सततच्या भूकंपांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि नागरिक दोघेही सावध आणि सज्ज आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran war : खामेनेईंच्या इराणला एका रात्रीत हादरवले; इस्रायलचे RAAM, SOUFA और ADIR ठरले बाहुबली
रशियाच्या कुरिल बेटांवर पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसल्याने या भागातील भौगोलिक अस्थिरतेचे गंभीर चित्र पुढे आले आहे. यापूर्वीच्या भूकंपांच्या पार्श्वभूमीवर, या भागात आणखी सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी आपत्कालीन सूचना आणि सरकारच्या निर्देशांचे पालन करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. भविष्यातील धोक्यांपासून संरक्षणासाठी या क्षेत्रात नवीन भूगर्भीय निगराणी प्रणालींची उभारणी आणि तत्काळ प्रतिसाद यंत्रणांची सुधारणा गरजेची बनली आहे.