इस्रायलने सीरियातील इराणच्या दूतावासावर केला हवाई हल्ला,किमान 8 जणांचा मृत्यू!

दूतावासाच्या इमारतीवर झालेल्या हल्ल्यात किमान 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मारल्या गेलेल्यांमध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या वरिष्ठ कमांडरचाही समावेश आहे.

  एकीकीडे इस्रायल आणि हमास मधील संघर्ष (Israel Hamas War) अद्यापही थांबलेला नाही. 7 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेल्या या युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे आता इस्रायलने सीरियाच्या राजधानीत असलेल्या इराणच्या दूतावासावर हल्ला केला. या हल्ल्यात (Israel strike on Iran Embassy in Syria) किमान 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या वरिष्ठ कमांडर रझा जाहेदी यांचाही समावेश आहे. मात्र, इस्रायलने या हल्ल्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इस्रायली सैन्याने इराणच्या दूतावासाच्या कॉन्सुलर विभागावर स्टेल्थ एफ-35 लढाऊ विमानातून सहा क्षेपणास्त्रे डागली ज्यात जाहिदीचा मृत्यू झाला.

  सीरियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने इराणच्या वाणिज्य दूतावासाच्या इमारतीला लक्ष्य करून हा हल्ला केला. राजधानी दमास्कसच्या शेजारील माझेह येथे असलेल्या इराणच्या दूतावासावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात राजधानीतील अत्यंत समृद्ध क्षेत्र असलेल्या अल-माझेह येथील इराणी दूतावासाला लागून असलेली ॲनेक्स इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली. इराणचा कमांडर मोहम्मद रजा झहेदी हा इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाला.

  राजदूत पूर्णपणे सुरक्षित

  इराणी मीडियाच्या मते, दमास्कसमध्ये इस्रायली हल्ल्यात ॲनेक्सी इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली परंतु राजदूताला कोणतीही हानी झाली नाही. तो सुरक्षित आहे. दमास्कसमधील इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे राजदूत होसेन अकबरी आणि त्यांच्या कुटुंबाला इस्रायली हल्ल्यात कोणतीही हानी झाली नाही, असे नूर वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

  सीरियाच्या मानवाधिकाराने मृत्यूची पुष्टी केली

  ब्रिटनस्थित सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सने म्हटले आहे की, इस्रायलने सीरियाच्या राजधानीवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. इराणच्या दूतावासाच्या इमारतीला लक्ष्य करून नष्ट करण्यात आले. या हल्ल्यात किमान 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

  दुसरीकडे, या हल्ल्यानंतर इस्रायलने कोणतीही प्रतिक्रिया किंवा अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टी आणि इतर अनेक भागात हल्ले तीव्र केले आहेत. इस्रायल अनेक महिन्यांपासून सतत हल्ले करत आहे. गाझा पट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. हमासचा खात्मा होईपर्यंत हल्ले सुरूच ठेवणार असल्याचा दावा इस्रायलने केला आहे.