ब्राझील दौऱ्यावर कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची टोमॅटो शेतीला भेट; आधुनिक सिंचन प्रणालीचे केले कौतुक ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
साओ पाउलो (ब्राझील) : केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान सध्या ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या बैठकीसाठी ब्राझीलच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यात त्यांनी ब्राझीलमधील अत्याधुनिक शेती प्रणालींचे निरीक्षण करत आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे कौतुक केले आहे. त्यांनी विशेषतः टोमॅटोच्या लागवडीतील यांत्रिक आणि कमी पाण्यातील प्रभावी सिंचन प्रणालीचे निरीक्षण केले.
या भेटीदरम्यान, चौहान यांनी ब्राझीलमधील टोमॅटो आणि मक्याच्या शेतांना भेट दिली, जिथे अत्याधुनिक पद्धतीने शेताची मशागत आणि सिंचन होत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी सांगितले की, “येथे संपूर्ण शेती यंत्रसामग्रीच्या सहाय्याने यांत्रिकीकृत करण्यात आली आहे. सिंचन व्यवस्थाही अत्यंत नियंत्रित असून, झाडाला आवश्यक तेवढेच पाणी दिले जाते. त्यामुळे कमी पाण्यात जास्त सिंचन करता येते.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जगातील सर्वात शक्तिशाली देशांची यादी जाहीर; पाहा भारत कोणत्या स्थानी?
ब्राझीलमधील शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या किफायतशीर सिंचन व्यवस्थेचे त्यांनी विशेष कौतुक केले. शिवराज सिंह चौहान म्हणाले, “भारतासारख्या पाण्याच्या मर्यादित स्रोत असलेल्या देशासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरू शकते. उत्पादन वाढवण्यासाठी अशा तंत्रज्ञानाचा भारतात वापर करण्याच्या दृष्टीने आम्ही कार्य करत आहोत.” शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानामुळे श्रम आणि संसाधनांची बचत होत असून, त्याचा फायदा थेट उत्पादनावर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी हे अनुभव भारताच्या कृषी विकासासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचेही सांगितले.
ब्राझीलच्या शेतीत यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून, विशेषतः कापूस आणि सोयाबीन कापणीसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांचा शिवराज सिंह यांनी उल्लेख केला. त्यांनी ब्राझीलच्या कृषी तज्ज्ञांशी संवाद साधताना या क्षेत्रात भारत-ब्राझील यांच्यातील सहकार्य वाढवण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “शेतीतील ज्ञानाची देवाण-घेवाण आणि परस्पर सहकार्यामुळे दोन्ही देशांच्या शेतकऱ्यांना फायदा होईल. मी ब्राझीलच्या कृषी समुदायाला भारतात येण्याचे आमंत्रण दिले आहे, जेणेकरून परस्पर अनुभवांच्या आदान-प्रदानातून दोन्ही देशांची शेती अधिक सक्षम होईल.”
ब्राझीलच्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारत आणि ब्राझीलमधील कृषी व्यापार २ ते ३ अब्ज डॉलर्सपर्यंत आहे, मात्र तो लवकरच १५ ते २० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ब्राझील भारतात खते, सोयाबीन, साखर, अन्नधान्य, मांस आणि भाज्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो. या व्यापारात वाढ होण्यासाठी दोन्ही देशांचे धोरणात्मक सहकार्य आणि तांत्रिक भागीदारी महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही चौहान यांनी स्पष्ट केले.
शिवराज सिंह चौहान यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत, ब्राझीलमधील शेती अनुभवाबद्दल प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले, “ब्राझीलमध्ये शेतीच्या अनेक नवकल्पनांचा अनुभव घेण्याची संधी मिळत आहे. येथे येऊन मी अनेक गोष्टी शिकत आहे, ज्या भारतात शेतीतील परिवर्तनासाठी उपयोगी ठरतील.” त्यांच्या या दौऱ्यामुळे भारताच्या कृषी धोरणांमध्ये नव्या संधींचे दालन खुले होण्याची शक्यता असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शाश्वत शेतीचा आधारभूत पाया तयार करण्याकडे भारताचा कल वाढतो आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीन तैवानच्या जीवावरच उठला; तैवान आणि जपान दरम्यान 6 अणु पाणबुड्यांची तैनाती
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा ब्राझील दौरा भारतासाठी कृषी क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाची दारे उघडणारा ठरत आहे. कमी पाण्यात जास्त उत्पादन देणाऱ्या पद्धती, यांत्रिकीकरण आणि जागतिक सहकार्याच्या माध्यमातून भारताची शेती आणखी सक्षम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.