एखादा देश अणुबॉम्बची विक्री करू शकतो का? काय सांगतो आंतरराष्ट्रीय कायदा?
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात अमेरिका देखील उघडपणे उतरली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणुऊर्जा केंद्रांवर फोर्डो, नतांज आणि इस्फहान – बी-2 स्टेल्थ बॉम्बर्सद्वारे जोरदार हल्ला चढवला. इराणचं यात मोठं नुकसान झालं आहे. इस्रायलने या कारवाईचं स्वागत केलं असून इराण अणुबॉम्ब तयार करत आहे आणि तो सर्वप्रथम इस्रायलवरच टाकण्यात येईल, असा दावा केला आहे.
अशा युद्धांवेळी एक प्रश्न नेहमी सतावतो तो म्हणजे इतर युद्ध सामग्रीप्रमामेच एखादा देश दुसऱ्या देशाकडून अणुबॉम्ब का खरेदी करू शकत नाही? आणि कुठले देश हे विकू शकतात का? चला, जाणून घेऊया यामागील आंतरराष्ट्रीय नियम काय आहेत.
जगात फक्त 9 देशांकडेच अण्वस्त्र
आजच्या घडीला जगात केवळ 9 देश असे आहेत, ज्यांच्याकडे अधिकृतपणे अण्वस्त्र आहेत रशिया, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, इस्त्रायल आणि उत्तर कोरिया. यातील केवळ पहिल्या पाच देशांनी – रशिया, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन – 1970 मध्ये अस्तित्वात आलेल्या NPT वर स्वाक्षरी केली होती. त्यामुळे यांना अण्वस्त्र बाळगण्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘कायदेशीर’ अधिकार मिळतो.
भारत, पाकिस्तान, इस्त्रायल आणि उत्तर कोरिया या देशांनी मात्र या करारावर स्वाक्षरी केली नाही, आणि त्यांनी स्वतंत्रपणे अण्वस्त्र निर्माण केले.
अणुबॉम्ब विकता येतो का?
सामान्य शस्त्रास्त्रांप्रमाणे, जसे की ड्रोन, फाइटर जेट, क्षेपणास्त्रे, टँक अनेक देश एकमेकांना विकत असतात. परंतु अणुबॉम्ब हा कोणत्याही परिस्थितीत विक्रीसाठी योग्य अस्त्र नाही. कारण हा एक असा महाविनाशक शस्त्रप्रकार आहे जो संपूर्ण मानवजातीसाठी धोका ठरू शकतो.
आंतरराष्ट्रीय नियम काय सांगतात?
NPT हा 1970 साली अस्तित्वात आलेला करार आहे, ज्याचा उद्देश, अण्वस्त्रांचा प्रसार (Proliferation) थांबवणे. जे देश अण्वस्त्रविहीन आहेत, त्यांना हे अस्त्र निर्माण करण्यापासून रोखणे शांततामय वापरासाठी अणुऊर्जा तंत्रज्ञानाचा प्रचार करणे.
ज्यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे, ते देश अण्वस्त्र कोणालाही विकू शकत नाहीत, त्याची तंत्रज्ञान किंवा साहित्य देखील दुसऱ्या देशाला देऊ शकत नाहीत. जर कोणी असा प्रयत्न केला, तर तो गंभीर आंतरराष्ट्रीय गुन्हा मानला जातो.
काय होऊ शकतात परिणाम?
संयुक्त राष्ट्रांकडून आर्थिक आणि व्यापारी निर्बंध
डिप्लोमॅटिक बहिष्कार
आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकीय अलगाव
लष्करी हस्तक्षेपाचीही शक्यता
या कारणांमुळेच, जगातील अण्वस्त्र संपन्न देश हे अस्त्र “फक्त आपल्यासाठी” राखून ठेवतात आणि त्याच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत दक्ष असतात.
Iran-Israel War : खेळ अजून संपलेला नाही! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणमध्ये घडतायेत मोठ्या घडामोडी
इराणचा दावा आहे की त्यांचा अणुऊर्जा कार्यक्रम शांततामय उद्देशासाठी आहे. परंतु अनेक पाश्चिमात्य देश, विशेषतः इस्त्रायल आणि अमेरिका, असा आरोप करतात की इराण लपूनछपून अण्वस्त्र विकसित करत आहे. या भीतीपोटीच इराणवर अनेक वर्षे आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. इराणने NPT करारावर स्वाक्षरी केली असली, तरी त्याचे काही नियम ते पाळत नाहीत, असा पश्चिमी देशांचा आरोप आहे.
अणुबॉम्ब विकणे किंवा खरेदी करणे आंतरराष्ट्रीय कायद्याने गुन्हा आहे. हे इतर कोणत्याही शस्त्रासारखे सहजपणे विकले-विकत घेतले जाऊ शकत नाही. कारण त्याचा परिणाम लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे यावर संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय समुदाय अत्यंत कडक लक्ष ठेवतो. जरी काही देश NPT च्या बाहेर असले, तरी अण्वस्त्र विक्रीस कोणताही खुला बाजार नाही, आणि भविष्यातही तो असण्याची शक्यता कमी आहे.