'जर आमच्यावर हल्ला झाला तर अमेरिकन सैन्य...', इराणच्या धमकीनंतर डोनाल्ड ट्रम्पची खामेनेईंना सक्त Warning ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
US Threat to Iran : पश्चिम आशियातील तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट आणि कठोर इशारा दिला आहे. इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेचा सहभाग नसतानाही, इराणकडून दिल्या गेलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “जर आमच्यावर कोणत्याही स्वरूपात हल्ला झाला, तर अमेरिकन सैन्य अशा प्रकारे प्रत्युत्तर देईल, जे इतिहासात कधीच पाहिले गेले नाही.”
शनिवारी ( दि 14 जून 2025 ) रात्री ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’ वरून ही प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, इस्रायलच्या हल्ल्यात अमेरिकेचा कोणताही थेट सहभाग नव्हता. त्यामुळे जर इराणने अमेरिकेला लक्ष्य केले, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. ट्रम्प यांनी इराण व इस्रायल यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी शांततेच्या कराराचा पर्याय सुचवला आणि लिहिले की, “आपण सहजपणे एक करार करू शकतो आणि या रक्तपाताला पूर्णविराम देऊ शकतो.” मात्र त्यांनी एकाच वेळी हा इशाराही दिला की, इराणने अमेरिकेच्या संयमाची चूक केली, तर त्याला जबर किंमत मोजावी लागेल.
डोनाल्ड ट्रम्पच्या इशाऱ्याच्या काही तास आधीच, शनिवारी रात्री इस्रायलने इराणवर मोठा हवाई हल्ला केला. ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत सलग तिसऱ्या दिवशी हा कारभार सुरू राहिला. या कारवाईत इराणच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय, अणुस्थळे आणि वीज प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आले. तेहरानमधील अणुशक्ती कार्यक्रमाशी संबंधित तळांवर हल्ला केल्याची कबुली इस्रायली संरक्षण दलाने दिली आहे. यामुळे जेरुसलेम आणि तेल अवीवमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजवण्यात आले, आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्रायलने अवकाशातच पाडले इराणी क्षेपणास्त्र; ‘Arrow 3’ प्रणालीने जगाला केले चकित
या हल्ल्यांनंतर इराणने त्वरित अमेरिकेसोबत ओमानमध्ये होणारी अणु चर्चा रद्द केली. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी इराणला त्यांच्या अणु कार्यक्रमासंदर्भात अमेरिकेशी करार करण्याचे आवाहन केले होते. त्याच वेळी, इराणच्या क्रांती रक्षक दलाने दावा केला की, त्यांच्या क्षेपणास्त्रांनी इस्रायलच्या ऊर्जा केंद्रांना आणि लढाऊ विमानांच्या इंधन निर्मितीच्या ठिकाणांना लक्ष्य केलं. हे हल्ले इस्रायलच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून केल्याचा दावा करण्यात आला.
या घडामोडींमध्ये आणखी एक गंभीर बाब म्हणजे इराणने अमेरिकेसह ब्रिटन व फ्रान्सला स्पष्ट इशारा दिला आहे. जर त्यांनी इस्रायलच्या बाजूने उभं राहत इराणी हल्ल्यांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचे लष्करी तळ आणि नौदल जहाजे थेट लक्ष्य केली जातील, असा खळबळजनक इशारा दिला गेला आहे. इराणच्या अणु कार्यक्रमावरून सुरू असलेला संघर्ष आता अधिक भयानक वळण घेण्याची शक्यता आहे. विश्लेषकांच्या मते, हे युद्ध फक्त इराण व इस्रायलपुरते मर्यादित राहणार नाही, तर ते पश्चिम आशियात आण्विक तणावाची ठिणगी उडवू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेत ‘No Kings’चा गजर! ट्रम्प यांच्या वाढदिवसादिवशी देशभर निदर्शने, 350 कोटींच्या परेडवर टीका
डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला सडेतोड इशारा ही अमेरिकेच्या भविष्यातील धोरणाची झलक मानली जात आहे. इस्रायल-इराण संघर्षात अमेरिका सहभागी नसतानाही, इराणने अमेरिकेवर हल्ला केल्यास त्याचा स्फोटक आणि विनाशकारी परिणाम होईल, हे ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. हे वक्तव्य केवळ इराणसाठीच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम आशियासाठी एक महत्त्वाचा इशारा आहे – शांततेचा मार्ग स्वीकारा, अन्यथा युद्धाचा परिणाम कोणालाही परवडणारा ठरणार नाही.