Bangladesh ISKCON Update : 70 वकील आणि पत्रकारांची सुटका करावी; बांगलादेश अल्पसंख्याक परिषदेची मागणी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
ढाका : बांगलादेशात चिन्मय प्रभूच्या अटकेनंतर हिंदूंमध्ये संताप आहे. यानंतर देशभरात उपस्थित चिन्मय प्रभूच्या समर्थकांनी आंदोलन केले आणि त्यात एका वकिलाचा मृत्यू झाला. वकिलाच्या हत्येनंतर वकील आणि पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याविरोधात आता बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदेने आवाज उठवत त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे.
बांगलादेशात सध्या परिस्थिती नियंत्रणात नाही. हिंदू संत चिन्मय दास यांना देशद्रोहाच्या प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. आता बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदेने ‘क्रूड बॉम्ब’ स्फोट आणि कारची तोडफोड यासह ७० अल्पसंख्याक वकील आणि चितगावच्या दोन पत्रकारांवरील आरोपांचा निषेध केला आहे. तसेच हे आरोप बनावट आणि खोटे असल्याचे सांगितले. बांगलादेशातील मीडियानुसार, इस्कॉनचे धार्मिक नेते चिन्मय प्रभू यांना देशात अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी निदर्शने केली. या हिंसाचारात एका वकिलाला आपला जीव गमवावा लागला. वकिलाच्या मृत्यूनंतर गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपींमध्ये 70 वकील आणि दोन पत्रकारांचाही समावेश आहे.
अल्पसंख्याक परिषदेने मागणी मांडली
वकील आणि पत्रकारांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी एका अधिकृत निवेदनात परिषदेने म्हटले आहे की, चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या देशद्रोहाच्या खटल्यात अडथळा आणण्यासाठी आणि त्यासंबंधित बातम्यांचा प्रसार बळजबरीने थांबवण्याच्या उद्देशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जे मानवी हक्क आणि कायद्याचे उल्लंघन करते.
बांगलादेशी सरकार आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी खोटा खटला तत्काळ मागे घ्यावा आणि वकील आणि पत्रकारांच्या सुटकेसाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीही परिषदेने केली आहे. शनिवारी बांगलादेशातील कोतवाली पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.
जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अखेर सीरियाच्या ‘बशर’ सरकारचा तख्तापलट ; रशिया आणि इराण आता मोठ्या संकटात, वाचा सविस्तर
दोन पुजारी बेपत्ता झाल्याचा आरोप
बांगलादेशी अधिकाऱ्यांनी आदिपुरुष श्याम दास आणि रंगनाथ दास ब्रह्मचारी या दोन पुजाऱ्यांना अटक केल्याचा आरोप इस्कॉन कोलकात्याने शनिवारी केला. चिन्मयचा सचिव कृष्णा दास यालाही अटक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष राधा रमण यांनी सांगितले की, पुजारी चिन्मय कृष्ण दास यांची भेट घेऊन घरी जात असताना पोलिसांनी त्यांना शुक्रवारी अटक केली.
चिन्मय कृष्ण दास याला बांगलादेशात 25 नोव्हेंबर रोजी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. राधा रमण म्हणाल्या, २९ नोव्हेंबर रोजी आदिपुरुष श्याम दास आणि रंगनाथ दास ब्रह्मचारी चिन्मय कृष्ण प्रभू यांची भेट घेऊन परतत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. चिन्मय कृष्ण दासच्या सचिवालाही अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दंगलखोरांनी बांगलादेशातील इस्कॉन केंद्राचीही तोडफोड केल्याचा दावा त्यांनी पुढे केला. चिन्मय कृष्ण दासला देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक झाल्यापासून बांगलादेशातील परिस्थिती गंभीर आहे. दास यांच्या अटकेनंतर त्यांच्या सुटकेसाठी देशात चळवळ उभी राहिली. 27 नोव्हेंबर रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलीस आणि समर्थकांमध्ये झालेल्या चकमकीत एका वकिलाचा मृत्यू झाला होता.
जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बांगलादेश ISKCON वाद विकोपाला; सचिव बेपत्ता, चिन्मय दासांना प्रसाद देण्यासाठी गेलेल्या दोन हिंदूंनाही अटक
भारतानेही निषेध केला
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा भारतातही तीव्र निषेध होत आहे. शुक्रवारी भारताने बांगलादेशमध्ये अतिरेकी वक्तृत्व आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारताने बांगलादेशी सरकारसमोर हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांचा मुद्दा सातत्याने मांडला आहे.