बांग्लादेशात राजकीय भूकंप! अंतरिम पंतप्रधान मोहम्मद युनूस राजीनाम्याच्या तयारीत, लष्कर व विरोधकांशी संघर्ष तीव्र ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Muhammad Yunus resignation : बांगलादेश सध्या एका अत्यंत गंभीर आणि अस्थिर राजकीय संकटातून जात आहे. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी सल्लागार परिषदेच्या ताज्या बैठकीत सांगितले की, “या परिस्थितीत मला स्वतःला एखाद्या ओलिसासारखे वाटत आहे,” ही भावना देशातील सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या अस्थिरतेचे प्रतिक ठरत आहे.
युनूस यांनी स्पष्टपणे सांगितले की, सद्यस्थितीत राजकीय सहमती तयार होणे अशक्य होत आहे आणि त्यामुळे एक कार्यक्षम प्रशासन चालवणे देखील अवघड झाले आहे. हे केवळ त्यांचे वैयक्तिक अपयश नाही, तर संपूर्ण राजकीय व्यवस्थेचे अपयश असल्याचे ते म्हणाले. राजकीय पक्षांमध्ये संवादाची कमतरता आणि निर्णयक्षमतेचा अभाव यामुळे ते प्रचंड दबावाखाली आहेत.
या संकटाचे मुख्य कारण म्हणजे, युनूस सरकारने अमेरिकेच्या सहकार्याने बांगलादेश-म्यानमार सीमेवर एक मानवतावादी कॉरिडॉर स्थापन करण्याची योजना आखली होती. ही योजना गुप्तपणे ठरवण्यात आली होती, ज्यामुळे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान संतप्त झाले. त्यांनी थेट डिसेंबरपर्यंत निवडणुका घेण्याचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे. यामुळे नागरी सरकार आणि लष्करामध्ये संघर्ष उफाळून आला आहे. ही परिस्थिती केवळ तात्पुरती अस्थिरता दर्शवत नाही, तर भविष्यातील सामाजिक आणि राजकीय संघर्षाचे संकेत देत आहे. लष्कराचा युनूस सरकारवरील विश्वास उडाल्यामुळे संविधानिक स्थैर्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जग अंधारात बुडणार? भयानक सौर वादळ सरकत आहे पृथ्वीच्या दिशेने; भोगावे लागणार गंभीर परिणाम
युनूस सरकारविरोधात विरोधी पक्ष, विद्यार्थी संघटना आणि सामान्य जनता सडकोंवर उतरली आहे. देशभरात निवडणुका घेण्याची मागणी करत निदर्शने करण्यात येत आहेत. या निदर्शांमध्ये महफूज आसिफ आणि खलीलूर रहमान यांच्यासारख्या वादग्रस्त मंत्र्यांना पदावरून हटवण्याचीही जोरदार मागणी केली जात आहे. याचा परिणाम असा झाला की, सध्याच्या सरकारचा लोकशाहीवरील विश्वास गमावत चालला आहे. हे सरकार आता सर्व स्तरांवर असमर्थ आणि अलोकप्रिय ठरू लागले आहे.
या संपूर्ण संकटाचा सुरुवात शेख हसीना यांच्यावरील सत्तापालट आणि भारतात पलायन झाल्यानंतर झाली होती. त्यानंतर स्थापन झालेले युनूस सरकार हे केवळ अंतरिम स्वरूपाचे होते आणि त्यांना कायमस्वरूपी सरकार स्थापन होईपर्यंत स्थिरता राखण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आजच्या घडीला हा प्रयोग अपयशी ठरल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले आहे. लष्कराचा दबाव, राजकीय पक्षांची नाराजी, आणि जनतेचा रोष पाहता युनूस सरकारचा अस्त जवळ आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताचे जेम्स बाँड अजित डोवाल यांनी पाकिस्तानमधून सरकारला पाठवली होती ‘त्यांची’ गुप्त माहिती; वाचा ‘ही’ चित्तथरारक कहाणी
संपूर्ण परिस्थिती पाहता, बांगलादेश एका निर्णायक वळणावर उभा आहे. जर लवकरच व्यापक राजकीय संवाद आणि लोकशाही प्रक्रियेला चालना देण्यात आली नाही, तर देश अराजकतेच्या दिशेने जाऊ शकतो. युनूस यांचा संभाव्य राजीनामा हा केवळ एका नेत्याचा निर्णय नसून, पूर्ण यंत्रणेच्या अपयशाचे प्रतीक ठरत आहे. आता बांगलादेशसमोरील प्रश्न असा आहे की, या संकटावर तो कसा मात करतो आणि लोकशाहीचा मार्ग टिकवून ठेवतो का?