बांगलादेशातील अल्पसंख्यांकावरील हल्ले थांबणार? मोहम्मद युनूस यांनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: 5 ऑगस्ट 2024 रोजी हिंसक विद्यार्थी आंदोलनानंतर शेख हसीना यांना देश सोडून जावे लागले. त्यांच्या देशातून पलायनानंतर देखील अल्पसंख्यांकावरील हल्ले सुरु होते. यामुळे जागतिक स्तरावर या घटनेचा निषेध केला जात होता. अल्पसंख्यांकावरील हल्ले थांबवण्यासाठी अनेक जागतिक प्रमुखांनी अनेक बैठका घेतला. आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी देशातील धार्मिक अल्पसंख्याकांबाबत एक सकारात्मक निर्णय घेतला आहे.
अल्पसंख्याकांवरील ह्ल्ले थांबवण्याचे आदेश
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांनी देशातील धार्मिक अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांना थांबवण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी देशातील सुरक्षा प्रमुखांना अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांना प्रतिबंध घालण्याचा आणि त्यांची पूर्ण सुरक्षितता सुनिश्चित करण्याचा आदेश युनूस यांनी दिला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, जर बांगलादेश आपल्याच देशातील धार्मिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करू शकला नाही, तर याचा परिणाम देशाच्या जागतिक प्रतिमेवर होईल आणि देशाचे मोठे नुकसान होईल. यामुळे देशाच्या सुरक्षिततेसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुरक्षा प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक
मोहम्मद युनुस यांनी सुरक्षा प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी सुरक्षा प्रमुखांना सांगितले की, देशातील कायदा व सुव्यवस्थेवर सतत नेजर ठेवण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करावी. ही समिती सर्व सुरुक्षा एजन्सींमध्ये समन्वय साधेल आणि गुप्तचर यंत्रणेची माहिती ठेवेल.
तसेच, युनुस यांनी असेही स्पष्ट केले की, सुरक्षा दलांनी आदुनिक उपकरणांचा जास्तीत जास्त उपयोग करावा, जेणेकरुन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ कारवाई करता येईल. त्यांनी सुरक्षा प्रमुखांना आदेश दिले की, देशातील प्रत्येक नागरिकांच्या हक्कांचे संरक्षणे करणे आणि धार्मिक तसेच जातीय अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांना रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात.
विशेष अधिकाऱ्यांची उपस्थिती
बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत झालेल्या या बैठकीत गृहविषयक सल्लागार जहांगीर आलम चौधरी, मुख्य सल्लागारांचे विशेष सहाय्यक खुदा बख्श चौधरी, गृह सचिव नसीमुल गनी, तसेच पोलिस प्रमुख, बॉर्डर गार्ड बांगलादेश, रॅपिड ॲक्शन बटालियन, ढाका मेट्रोपॉलिटन पोलिस, तटरक्षक दल आणि विशेष शाखेचे अधिकारी उपस्थित होते.
मोहम्मद युनूस यांच्या या निर्णयामुळे बांगलादेशमधील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची हमी मिळेल आणि देशातील शांतता व स्थैर्य टिकून राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.