डोनाल्ड ट्रम्पने अखेर 'त्या' भारतीयांविरोधात घेतला निर्णय; थेट लष्करी विमानांचा वापर करुन... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेताच देशातून अवैध स्थलांतरितांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांविरुद्ध कठोर धोरणे अवलंबली आहेत. ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरितांच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आणि सत्तेच्या केवळ 11 दिवसांतच 25,000 हून अधिक अवैध प्रवाशांना अटक करण्यात आली होती. या धोरणांतर्गत बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना त्यांच्या मूळ देशात परत पाठविण्यासाठी लष्करी विमानांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकेच्या लष्कराचे C-17 विमान भारतीय स्थलांतरितांना घेऊन भारताकडे रवाना झाले आहे, अशी माहिती एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिली. ट्रम्प प्रशासनाने स्थलांतर धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी लष्करी मदत घेतली आहे. यासाठी अमेरिका-मेक्सिको सीमेवर अतिरिक्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तसेच लष्करी विमानांचा वापर करून स्थलांतरितांना त्यांच्या मूळ देशात परत पाठविले जात आहे, आणि लष्करी तळांवर त्यांना तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात येत आहे.
पेंटागनने दिली विमाने
अवैध स्थलांतरितांना पेंटागनने एल पासो, टेक्सास, आणि सॅन डिएगो, कॅलिफोर्निया येथे कैदेत ठोवले होते. आता यातील 5,000 पेक्षा अधिक बेकायदेशीर स्थलांतरितांना त्यांच्या मूळ देशात परत पाठविण्यासाठी लष्करी विमानांची उपलब्धता केली आहे. आतापर्यंत, या लष्करी विमानांनी ग्वाटेमाला, पेरू, आणि होंडुरास येथे स्थलांतरितांना पोहोचविले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, यामध्ये सर्वाधिक बेकायदेशीर स्थलांतरित भारतीय आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार, सुमारे 725,000 भारतीय बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहत होते, यामुळे मेक्सिको आणि अल साल्वाडोरनंतर ही तिसऱ्या क्रमांकाची मोठी संख्या आहे.
भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम होणार
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतीय स्थलांतरितांच्या निर्वासनाच्या कारवाईमुळे भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतीय सरकारने अमेरिकेशी सहकार्य करून बेकायदेशीर स्थलांतरितांची ओळख पटवून त्यांना परत आणण्याची योजना आखली आहे, यामुळे दोन्ही देशांमधील स्थलांतर धोरणांवर चर्चा सुरू आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या कठोर धोरणांमुळे बेकायदेशीर स्थलांतरितांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे, आणि त्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठविण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
मेक्सिकोतून घुसखोरीच्या घटनांमध्ये मोठी घट
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर प्रशासनाने कठोर सीमा नियंत्रण धोरण स्वीकारले आहे. यामुळे मेक्सिको सीमेमार्गे घुसखोरीच्या घटनांमध्ये 94% घट झाली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सत्तेच्या कालावधीत 1 जानेवारी ते 19 जानेवारीदरम्यान दररोज सरासरी 2087 घुसखोरीच्या घटना घडत होत्या, मात्र, ट्रम्प यांच्या सत्ता स्वीकारल्यानंतर हा आकडा केवळ 11 दिवसांत 126 पर्यंत खाली आला आहे.