डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला नायजेरियात लष्करी कारवाईसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहे (फोटो - सोशल मीडिया)
Nigeria US Relations: वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अनेकदा आपल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण करत असतात. युद्ध थांबवण्याचा दावा करणारे डोनाल्ड ट्रम्प हे दुसरीकडे आगाीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. एकीकडे अमेरिका व्हेनेझुएलाशी लढण्यास सज्ज आहे, तर दुसरीकडे त्यांनी आपल्या सैन्याला एका आफ्रिकन देशाविरुद्ध सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला नायजेरियात लष्करी कारवाईसाठी पूर्णपणे तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. नायजेरिया सरकार देशातील ख्रिश्चनांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे विध्वंसक युद्धामध्ये डोनाल्ड ट्रम्प आणखी एक वादाची ठिणगी टाकत असल्याचे दिसून येत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, “जर नायजेरिया सरकार ख्रिश्चनांच्या हत्या थांबवण्यात अपयशी ठरले तर अमेरिका नायजेरियाला मिळणारी सर्व मदत तात्काळ थांबवेल. आम्ही त्या कुप्रसिद्ध देशात जाऊन इस्लामिक दहशतवाद्यांना संपवण्यासाठी कारवाई करू शकतो. मी संरक्षण विभागाला संभाव्य कारवाईसाठी तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. जर हल्ला झाला तर तो जलद, धोकादायक आणि निर्णायक असेल – जसे हे दहशतवादी आपल्या प्रिय ख्रिश्चनांवर हल्ला करतात.” असा आक्रमक पवित्रा डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नायजेरिया-अमेरिकेमध्ये वाद सुरु!
डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाला चेतावणी देणारे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विधानावर नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी देताना नायजेरियाला धार्मिकदृष्ट्या असहिष्णु देश म्हणणे चुकीचे आहे अशी स्पष्ट भूमिका मांडली. टिनुबू म्हणाले की, धार्मिक स्वातंत्र्य आणि सहिष्णुता ही आपल्या ओळखीचा भाग आहे. नायजेरिया सर्व धर्मांच्या नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी देतो. नायजेरियातील ख्रिश्चन धर्म अस्तित्वाच्या संकटाचा सामना करत आहे आणि त्यामागे कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादी आहेत या ट्रम्प यांच्या विधानाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले. यापूर्वी, अमेरिकन सिनेटर टेड क्रूझ यांनी नायजेरियाला धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारा देश घोषित करण्याची मागणी केली होती.
देशांर्गत बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नायजेरियाच्या २२ कोटी लोकसंख्येत मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांचे प्रमाण जवळपास समान आहे. बोको हराम सारख्या दहशतवादी गटांकडून या देशाला बराच काळ हिंसाचार सहन करावा लागला आहे, जे इस्लामिक कायद्याचे त्यांचे कट्टरपंथी अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, विश्लेषकांचा असा विश्वास आहे की नायजेरियाच्या मुस्लिम बहुल उत्तरेकडील प्रदेशांमध्ये हल्ल्यांचे बळी बहुतेक मुस्लिम आहेत, कारण दहशतवादी त्यांना पुरेसे मुस्लिम मानत नाहीत. अमेरिकेने अलीकडेच ख्रिश्चनांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा नायजेरियन सरकारने अमेरिकेचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले. यामुळे संतप्त झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आता अक्षरशः युद्धाची घोषणा केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे धार्मिक युद्ध पेटण्याची शक्यता आहे.






