Fuel Crunch in Russia : पुतिन चिंतेत! रशियात पेट्रोल-डिझलेचा तुटवडा; भारताला तेल पुरवणाऱ्या देशात इंधन संकट का निर्माण झालं? (फोटो सौजन्य: एआय)
युनायडेट रशिया पक्षाच्या परिषदेत बोलताना पुतिन यांनी सांगितले की, देशाच्या अनेक भागात इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. काही शहरांमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. व्यावसायिकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पुतिन यांनी सांगितले.
पुतिन यांनी शेती हंगाम सुरु असल्याने शेतकऱ्यांना डिझेल-पेट्रोलचा पुरेसा पुरवठा करण्याचे आदेशही दिले. रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनी देखील देशांतर्गत मागणी पुर्ण करण्याचा इंधन निर्यात धोरणावर विचारविनिमय सुरु असल्याचे सांगितले.
तज्ज्ञांच्या मते, रशियावर युक्रेनकडून सातत्याने होत असलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेनने गेल्या काही महिन्यात रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर आणि उर्जा पायाभूत सुविधांवर निशाणा साधला. या हल्ल्यांमुळे अनेक रिफायनरीजचे नुकसान झाले आहे. कच्चा तेलाचे पेट्रोल आणि डिझेलमध्ये रुपांतर करण्याची क्षमता घटत आहे. यामुळे देशांतर्गत पुरवठ्यावर संकट निर्माण झाले आहे.
रशिया मोठ्या प्रमाणात उर्जा निर्यातीवर अवलंबून आहे. मात्र, युक्रेननचे सततचे हल्ले कच्चा तेलापासून पेट्रोल-डिझेल बनवण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करत आहेत. यामुळे रशियाच्या निर्यातीवर संकट निर्माण झाले आहे. ही परिस्थिती रशियासाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत चिंताजनक मानली जात आहे.
एकीकडे देशांतर्गत इंधन टंचाई आणि दुसरीकडे तेल निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे पुतिन सरकारसमोर दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.






