Pak-Afghan War : कराची हल्ल्यानंतर पाकिस्तानचा पलटवार; अफगाण सीमेवर मध्यरात्री मोठी लष्करी कारवाई, २० हून अधिक ठार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पाकिस्तानचे माहितीमंत्री अत्ताउल्ला तरार यांनी माध्यमांशी संवाद साधताना, त्यांच्या सैन्याने ही गुप्त कारवाई केल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाक-अफगाण सीमावर्ती भागांत काही ठिकणांना लक्ष्य करण्यात आले आहे. या ठिकाणी पाकिस्तानविरोधी कट रचला जात होता, असा दावा तरार यांनी केला. पण या लष्करी मोहिमेमुळे सीमेवर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी (२७ जून) रात्री पाकिस्तानच्या कराची येथील गुलिस्तान-ए-जौहर परिसरात सिंध रेंजर्सच्या प्रादेशिक मुख्यालयावर हल्ला करण्यात आला होता. मुख्यालयावर स्फोटकांनी भरलेले वाहन प्रवेशद्वाराजवळ आदळवण्यात आले आणि त्यानंतर गोळीबारही करण्यात आला होता. या हल्ल्यात पाकिस्तान रेंजर्सचे ३ जवान ठार झाले होते. तर अनेक हल्लेखोरांनाही ठार केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता.
या हल्ल्यानंतर पाकिस्तानने रविवारी (२८ जून) मध्यरात्री अफगाण सीमेलगत हल्ले केले. पाकिस्तानने ही कारवाई कराचीसह देशांच्या इतर भागांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना उत्तर असल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तान, आणि कराची हल्ल्यांमध्ये नागरिक आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यात येत होते. अफगाण सीमेवरुन या हल्ल्यांचे नियोजन होत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.
सध्या या कारवाईवर अफगाणिस्तानकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दोन्ही देशांतील हा वाद काही नवीन नाही. गेल्या अनेक दशकांपासून सीमावाद आणि दहशतवादाच्या मुद्द्यावरुन अफगाण पाकिस्तानमध्ये तणावाचे संबंध राहिले आहेत. या नव्या लष्करी कारवाईमुळे मात्र परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानचा आरो आहे की, अफगाणिस्तानच्या काही भागांमध्ये तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान यांसारख्या दहशतवादी संघटनांना आश्रय दिला जात आहे. या संघटनांकडून पाकिस्तानवर हल्ले केले जात असल्याचा आरोप आहे. तर अफगाणिस्तानने हा आरोप फेटाळला असून पाकिस्तानचे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत आहे. दोन्ही देशांमध्ये दुरंड सीमारेषेवरुनही जुना वाद आहे. अफगाणिस्तानने या सीमेला आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मान्यता दिलेली नाही.






