'पाकिस्तानने अणुबॉम्ब वापरला असता तर...' इंडोनेशियात झाला खुलासा, अणुयुद्धाच्या शक्यतेवर भारतीय नौदल अधिकाऱ्यांची पाकिस्तानला खडसावनी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India Pakistan nuclear crisis : भारत-पाकिस्तान दरम्यान अलीकडे घडलेल्या संघर्षात, जर पाकिस्तानने अणुबॉम्बचा वापर केला असता, तर भारताने त्याला नकाशावरून पुसून टाकले असते, असा धक्कादायक खुलासा इंडोनेशियातील भारतीय संरक्षण अधिकाऱ्यांनी केला आहे. इंडोनेशियन वायुसेना विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या चर्चासत्रात भारतीय नौदलाचे कॅप्टन शिव कुमार यांनी ही माहिती उघड केली.
भारताचे अणु धोरण, हवाई सामर्थ्य आणि पाकिस्तानविरुद्ध चालवलेले ऑपरेशन सिंदूर यावर सविस्तर चर्चा या चर्चासत्रात झाली. यामध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या अकरा हवाई तळांवर केलेल्या अचूक हल्ल्यांचे विश्लेषण करण्यात आले आणि भारताच्या धोरणात्मक संयमाचे कौतुक करण्यात आले.
कॅप्टन शिव कुमार यांनी ठामपणे सांगितले, “जर पाकिस्तानने भारतावर अणुहल्ला केला असता, तर भारताने पाकिस्तानचा संपूर्ण नाश केला असता. हे आमच्या अणु धोरणाचे स्पष्ट धोरण आहे.” त्यांच्या या विधानाने उपस्थित संरक्षण तज्ज्ञ आणि श्रोते अचंबित झाले. त्यांनी यावेळी स्पष्ट केले की, भारत फक्त अणुब्लॅकमेलिंगला बळी पडणार नाही, तर अशा प्रसंगी तितक्याच तीव्रतेने प्रत्युत्तर देण्यासाठी सिद्ध आहे. या विधानानंतर भारताच्या ‘नो फर्स्ट युज’ (NFU) धोरणाच्या कठोरतेची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये अत्याधुनिक प्रेसिजन-गाईडेड क्षेपणास्त्रे, स्टेल्थ ड्रोन आणि रेडिएशन-विरोधी शस्त्रसामग्री यांचा वापर करण्यात आला होता. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानच्या 11 हवाई तळांवर तणाव निर्माण झाला. नूर खान (चकलाला, रावळपिंडी), रफीकी (शोरकोट), आणि भोलारी यांसारख्या तळांवर भारतीय हल्ले इतके अचूक होते की पाकिस्तानी विमाने उड्डाण करु शकली नाहीत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पृथ्वी बदलतेय तीच रूप! इथिओपियामध्ये शास्त्रज्ञांना जमिनीखाली ऐकू आले ‘हृदयाचे ठोके, अनोखा खुलासा आला समोर
इंडोनेशियन हवाई दल आणि सुरक्षा तज्ज्ञांनी भारताच्या संयमाचे आणि सामर्थ्याचे कौतुक करताना म्हटले की, भारताने अणु मर्यादांच्या खाली राहून अत्यंत संतुलित आणि परंतु परिणामकारक प्रतिसाद दिला. युद्ध पूर्णपणे नियंत्रणात ठेवत, भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले धैर्य, बुद्धिमत्ता आणि लष्करी क्षमता दाखवली आहे.
या चर्चासत्रात भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील विधानाचीही चर्चा झाली, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की, “भारत दहशतवादी कारवायांना युद्ध समजेल.” यामुळे भारताच्या नव्या लष्करी आणि कूटनीतिक धोरणाची ठळक झलक मिळाली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : U.S. Aid Leverage Israel : नेतन्याहूंवरील भ्रष्टाचाराच्या खटल्यावरून ट्रम्प पुन्हा संतापले, इस्रायलकडून केली ‘मोठी मागणी’
भारतीय नौदल अधिकाऱ्यांच्या या विधानांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. भारत आता केवळ संयमित देश राहिलेला नाही, तर त्याने स्वतःची सामर्थ्यसंपन्न अणुशक्ती म्हणून ओळख निर्माण केली आहे. पाकिस्तानसारख्या देशांनी वारंवार अणुबॉम्बची धमकी दिल्यास भारत त्याला केवळ तोंडी उत्तर न देता, प्रत्यक्ष कृतीने प्रत्युत्तर देण्यास सिद्ध आहे. इंडोनेशियातील या खुलाशामुळे भारताच्या लष्करी धोरणांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक विश्वास निर्माण होतोय आणि शेजारी देशांसाठी हा स्पष्ट इशारा देखील आहे.