नेतन्याहूंवरील भ्रष्टाचाराच्या खटल्यावरून ट्रम्प पुन्हा संतापले, इस्रायलकडून केली 'मोठी मागणी' ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Donald Trump on Netanyahu : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराच्या खटल्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा संतापले आहेत. ट्रम्प यांनी इस्रायल सरकार आणि न्याय यंत्रणेवर अप्रत्यक्ष निशाणा साधताना म्हटले आहे की, “बीबीला जाऊ द्या, त्याला खूप काम करायचे आहे!” ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ’ वर एक प्रदीर्घ पोस्ट शेअर करत नेतन्याहू यांच्यावरील खटल्याला “राजकीय सूड” ठरवले. त्यांनी असा इशाराही दिला की, या खटल्यामुळे इस्रायलचे गाझा व इराणसारख्या संवेदनशील प्रकरणांशी चाललेले व्यवहार बिघडू शकतात.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतन्याहू यांचं वर्णन “युद्ध नायक” असं करत त्यांचे अमेरिकेसोबतचे संबंध, विशेषतः इराणच्या अणु धोक्यावर काम करताना दाखवलेली सहकार्यभावना यांचे विशेष कौतुक केले. ट्रम्प म्हणाले, “बीबी यांनी अमेरिकेसोबत मिळून इराणमधील अणु धोक्याचा सामना करण्यासाठी उत्तम कामगिरी केली आहे.” ते पुढे म्हणाले, “सध्या बीबी नेतन्याहू हमाससोबत ओलिसांच्या सुटकेबाबत अत्यंत महत्त्वाचा करार करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा काळात त्यांना कोर्टाच्या कठड्यावर बसवणे ही मोठी अडचण ठरू शकते.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘डेथ टू इजरायल, डेथ टू अमेरिका…’ इस्रायली हल्ल्यात जीव गमावलेल्या लष्करी कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांना इराणचा अंतिम निरोप
ट्रम्प यांनी नेतन्याहूंविरोधातील न्यायिक प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, “नेतन्याहूंना दिवसभर कोर्टात बसवले जात आहे, तेही सिगार आणि बग्स बनी डॉलसह? हा ठोस पुराव्यांशिवाय चालवला जाणारा छळ आहे, जो राजकीय सूडातून प्रेरित आहे.” त्यांनी लिहिले की, “न्यायाची ही थट्टा इराण आणि हमाससोबत होणाऱ्या चर्चांमध्ये मोठा अडथळा निर्माण करू शकते. अशा काळात नेतन्याहूंना संपूर्ण वेळ आणि लक्ष देणे आवश्यक आहे.”
नेतन्याहूंवरील खटल्याच्या संदर्भात ट्रम्प यांनी इस्रायलला मिळणाऱ्या अमेरिकेच्या आर्थिक मदतीचा मुद्दा उचलून धरला. त्यांनी लिहिले की, “अमेरिका दरवर्षी इस्रायलसाठी संरक्षण व सहाय्य यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करते. हे इतर कोणत्याही राष्ट्रासाठी केले जात नाही. मग अशा वेळी नेतन्याहूंवर असा छळ का?” ते पुढे म्हणाले, “बीबीला जाऊ द्या. त्याच्याकडे खूप महत्त्वाचे काम आहे. आम्ही नुकताच एक मोठा विजय मिळवला आहे आणि हा खटला त्या विजयावर कलंक लावतो आहे.”
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे. नेतन्याहूंवरील खटल्याला आता अमेरिकेच्या राजकीय दबावाचा अंश जोडला जाऊ शकतो, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे. इस्रायलमध्ये नेतन्याहूंवर तीन वेगवेगळ्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये खटले सुरू आहेत, ज्यात त्यांच्यावर महागड्या भेटवस्तू घेणे, व्यापाऱ्यांना लाभ देणे आणि प्रसारमाध्यमांवर प्रभाव टाकण्याचे आरोप आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराण हट्टाला पेटला! अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही ‘Fordow Nuclear Power Plant’च्या सॅटेलाईट प्रतिमा पाहून इस्रायल अस्वस्थ
नेतन्याहूंविरोधातील खटल्यामुळे इस्रायलमध्ये राजकीय पेच निर्माण झाला असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांची तीव्र प्रतिक्रिया नव्या वादाला सुरुवात करू शकते. ट्रम्प यांच्या वक्तव्याचा इस्रायली न्यायप्रणालीवर आणि सरकारच्या निर्णयप्रक्रियेवर परिणाम होईल की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे ट्रम्प नेतन्याहू यांना पूर्ण समर्थन देत आहेत आणि यासाठी अमेरिकेच्या आर्थिक मदतीचा मुद्दा केंद्रस्थानी आणत आहेत.