इस्लामाबाद : आर्थिक संकटाच्या काळातून (Pakistan Crisis) जात असलेल्या पाकिस्तानमध्ये विमाने आणि हेलिकॉप्टरसाठी जेट इंधनाचा मोठा तुटवडा (Pakistan Fuel Crisis) निर्माण झाला असून, त्यामुळे विमानांचे उड्डाण थांबवावे लागले आहे. पाकिस्तानच्या ईधी एअर ऍम्ब्युलन्ससह अनेक कंपन्यांनी त्यांचे काम बंद केले आहे. ‘स्काय विंग्ज एव्हिएशन कंपनी’ने (Wings And Sky Aviation Private Limited) एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.
स्काय विंग्स एव्हिएशन कंपनी वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचे काम करते. ईधी एअर ऍम्ब्युलन्स सेवा बंद केल्यास गंभीर आजारी रुग्णांचे प्राण वाचविण्याचे काम ठप्प होईल, असे सांगण्यात आले. ‘स्टेट बँक ऑफ पाकिस्तान’ने जेट इंधनाचे लेटर ऑफ क्रेडिट देण्यास नकार दिल्याचा दावा त्यांनी केला. हे इंधन डिसेंबर 2022 पासून कराची बंदरात अडकले. हे जेट इंधन मिळवण्यासाठी या कंपनीला 23 हजार डॉलर्स द्यावे लागतील आणि त्याची रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे. दरम्यान, ब्रिटनच्या प्रसिद्ध विमान कंपनी व्हर्जिन अटलांटिकने पाकिस्तानातून आपला गाशा गुंडाळला. ईधी विमानसेवा बंद झाल्याचा फटका पाकिस्तानातील रुग्णांना सहन करावा लागणार आहे.
व्हर्जिन अटलांटिकची सेवा समाप्तीची घोषणा
कंपनीने म्हटले आहे की, बँक स्टेट बँक ऑफ पाकिस्तानकडे हे प्रकरण उचलण्यास घाबरत आहे. ईधी एअरने सांगितले की, आम्ही आता इंधनाच्या कमतरतेमुळे आपात्कालीन परिस्थितीत रुग्णांना बाहेर काढण्यास नकार दिला आहे. या संकटात कंपनीने सरकारची मदत मागितली आहे. वास्तविक, पाकिस्तानचा डॉलरचा साठा 3 अब्ज डॉलरच्या खाली पोहोचला आहे. ज्यामुळे ते जीवनावश्यक वस्तूंची आयात करू शकत नाही. दरम्यान, ब्रिटनची प्रसिद्ध कंपनी व्हर्जिन अटलांटिकने येत्या काही महिन्यांत पाकिस्तानमधील आपली सेवा बंद करणार असल्याची घोषणा केली आहे.
1 मे पर्यंत उड्डाणे सुरु ठेवणार
एअरलाइन सध्या लाहोर आणि इस्लामाबाद दरम्यान यूकेमधील हिथ्रो विमानतळावरून उड्डाणे करते. लंडन आणि लाहोरदरम्यान 1 मे पर्यंत उड्डाणे सुरू ठेवणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. लंडन ते इस्लामाबाद हे विमान 9 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.