ऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ल्यात 'हैदराबाद कनेक्शन' उघड! (Photo Credit - X)
हल्लेखोर साजिद अक्रम मूळचा हैदराबादी
तपास यंत्रणांनी दिलेल्या महत्त्वाच्या माहितीनुसार, या हल्ल्यातील मुख्य आरोपी साजिद अक्रम हा मूळचा भारताच्या हैदराबाद येथील रहिवासी होता. त्याने १९९८ मध्ये भारत सोडला आणि तेव्हापासून तो ऑस्ट्रेलियात राहत होता. त्याने शेवटचा २०२२ मध्ये भारत दौरा केला होता. यापूर्वी अनेक माध्यमांनी हल्लेखोराला पाकिस्तानी नागरिक म्हणून ओळखले होते, परंतु आता त्याची भारतीय पार्श्वभूमी निश्चित झाली आहे.
२७ वर्षांत फक्त सहा वेळा भारत भेट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या २७ वर्षांत साजिदचा हैदराबादमधील त्याच्या नातेवाईकांशी फार कमी संपर्क होता. तो मालमत्ता किंवा कौटुंबिक बाबींसाठी फक्त सहा वेळा भारतात आला होता. वडिलांच्या मृत्यूसाठीही त्याला भारतात येणे महत्त्वाचे वाटले नाही. हैदराबादमध्ये राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्याला त्याच्या कट्टरपंथी विचारसरणीबद्दल किंवा कारवायांबद्दल काहीही माहिती नव्हती. तेलंगणा पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, १९९८ मध्ये देश सोडण्यापूर्वी साजिद अक्रमचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता. पोलिसांचा असा विश्वास आहे की, साजिद आणि त्याच्या मुलाचे कट्टरपंथी होणे हे भारत किंवा तेलंगणातील स्थानिक प्रभावाचे परिणाम नाही.
हल्ल्याची योजना फिलीपिन्समध्ये?
CNN च्या वृत्तानुसार साजिद अक्रम १ नोव्हेंबर रोजी त्याचा मुलगा नवीदसोबत फिलीपिन्सला गेला होता. साजिदने भारतीय पासपोर्ट वापरला, तर मुलाने (नवीद) ऑस्ट्रेलियन पासपोर्टवर प्रवास केला. दहशतवादी वडील आणि मुलाने सुमारे एक महिना दक्षिण फिलीपिन्समधील दावाओ शहरात राहून हल्ल्याची योजना आखली. हा परिसर इस्लामिक अतिरेकी संघटनांचा बालेकिल्ला मानला जातो.
ISIS कनेक्शनचा संशय
तपास यंत्रणांना दहशतवाद्यांच्या गाडीतून दोन आयसिसचे झेंडे (ISIS flags) जप्त झाले आहेत. यामुळे हल्लेखोर आयसिसशी संबंधित असल्याचा संशय आणखी वाढला आहे. ऑस्ट्रेलियन सुरक्षा संस्था या दहशतवादी नेटवर्कच्या आंतरराष्ट्रीय संबंधांची सखोल चौकशी करत आहेत. या हल्ल्यात तीन भारतीय विद्यार्थीही जखमी झाले असून, त्यापैकी किमान दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पंतप्रधानांचा निषेध
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. हल्लेखोरांची विचारसरणी इस्लामिक स्टेटसारख्या दहशतवादी विचारसरणीने प्रभावित होती. ‘इस्लामची कट्टरपंथी आणि हिंसक व्याख्या हे गंभीर जागतिक आव्हान बनले आहे आणि त्याला कठोरपणे तोंड द्यावे लागेल,’ असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.






