भारताचा 'हा' सिक्रेट एअरबेस म्हणजे पाकिस्तानच्या घशात अडकलेला काटा, का? ते जाणून घ्या ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Ayni Airbase Pakistan threat : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कराला पाकिस्तानविरोधात निर्णायक कारवाईचे मोकळे हात दिले आहेत. अशा पार्श्वभूमीवर, भारताचा ताजिकिस्तानमधील आयनी हवाई तळ ज्याला गिसार मिलिटरी एअरबेस (GMA) म्हणूनही ओळखले जाते पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा एअरबेस पाकिस्तानच्या पश्चिम सीमेपासून केवळ ६०० किमी अंतरावर असल्याने, या तळावरून भारत कधीही पाकमध्ये लष्करी कारवाई करू शकतो अशी भीती इस्लामाबादला सतावते.
या गुप्त परदेशी तळाची पायाभरणी १९९० च्या दशकात भारताने अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील उत्तर आघाडीला पाठिंबा देताना केली होती. अफगाणिस्तानच्या गृहयुद्धात अहमद शाह मसूद यांच्या नेतृत्वाखालील उत्तर आघाडीला भारताने मदत केली होती. मसूद यांच्यावर ९ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर त्यांना याच लष्करी रुग्णालयात आणण्यात आले होते. हीच पार्श्वभूमी पुढे भारताच्या ताजिकिस्तानमधील लष्करी उपस्थितीचा पाया ठरली.
आयनी एअरबेसची स्थानिक भूमिका अत्यंत रणनीतिक मानली जाते. दुशान्बेच्या पश्चिमेला असलेला हा तळ अफगाणिस्तान सीमेपासून अवघ्या १५० किमीवर आहे. येथे मोठ्या लढाऊ विमानांसाठी उपयुक्त अशी ३२०० मीटर लांब धावपट्टी तयार करण्यात आली असून, हँगर, इंधन भरण्याची व्यवस्था आणि विमान देखभालीच्या सोयीही आहेत. भारतीय हवाई दलाने येथे Su-30MKI सारख्या शक्तिशाली लढाऊ विमानांची तैनाती केल्याचे अहवाल सुचवतात, जरी अधिकृत पुष्टी अद्याप नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘बांगलादेशची आठवण तुमच्या पुढच्या पिढ्यांनाही करून द्या…’ बलुच नेत्याने असीम मुनीरला दिली उघड धमकी
पाकिस्तानने आपल्या पूर्व सीमेवर हवाई संरक्षण यंत्रणा बळकट केली आहे, परंतु अफगाणिस्तानालगतच्या पश्चिम सीमेवर त्यांची तयारी अत्यंत कमकुवत आहे. याच मर्यादेचा फायदा घेत, भारत आयनी एअरबेसवरून गुप्तचर मोहिमा (ISR), शत्रूच्या हालचालींवर पाळत ठेवणे तसेच गरज भासल्यास हवाई कारवाईदेखील करू शकतो. पेशावर अवघ्या ५०० किमीवर, तर इस्लामाबाद व पाकव्याप्त काश्मीर फक्त ६०० किमीवर असल्याने, भारताने येथे लढाऊ विमाने पाठवली तर पाकिस्तानला वेळेवर प्रतिसाद देणे अवघड ठरू शकते.
या एअरबेसचा पुनर्विकास भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि माजी हवाई दल प्रमुख बी.एस. धनोआ यांच्या पुढाकारामुळे शक्य झाला. वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात या प्रकल्पाला सुरुवात झाली. अंदाजे १०० दशलक्ष डॉलर्स खर्च करून भारताने हा तळ आधुनिक बनवला आहे. यामुळे पाकिस्तानला दोन आघाड्यांवर हवाई संरक्षणाची तैनाती करावी लागणार आहे, जी त्यांच्या मर्यादित संसाधनांसाठी मोठी अडचण ठरू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारतावर केला दहशतवादाचा आरोप आणि स्वतःच्याच जाळ्यात अडकला पाकिस्तान; बनावट पुरावे आले समोर
भारताचा आयनी एअरबेस म्हणजे पाकिस्तानसाठी एक ‘स्लीपिंग ड्रॅगन’ आहे शांत पण अत्यंत घातक. कोणत्याही क्षणी या तळावरून हवाई कारवाई होऊ शकते याची कल्पनाच पाकिस्तानला थरथरवून सोडते. त्यामुळेच इस्लामाबादला भारताच्या या ‘गुप्त’ हत्याराची सर्वाधिक भीती वाटते.