भारतावर केला दहशतवादाचा आरोप आणि स्वतःच्याच जाळ्यात अडकला पाकिस्तान; बनावट पुरावे आले समोर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Indian experts expose Pakistan : भारतावर दहशतवादी हल्ल्यांचे आरोप करत पाकिस्तानने पुन्हा एकदा बनावट पुरावे सादर करून जागतिक स्तरावर आपली विश्वासार्हता गमावली आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप करत एका पत्रकार परिषदेमध्ये तथाकथित पुरावे सादर केले होते. मात्र, भारतीय सायबर तज्ज्ञांनी या तथाकथित पुराव्यांचा भांडाफोड करताना दाखवले की हे सर्व पुरावे खोटे, जुने आणि डिजिटलरीत्या छेडछाड केलेले आहेत.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे अलीकडेच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत सरकारने यामागे पाकिस्तानी कट असल्याचा संशय व्यक्त केला. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) हल्ल्याचा तपास करत असून, प्राथमिक निष्कर्षानुसार हा कट पाकिस्तानमध्ये रचण्यात आला होता, असे स्पष्ट झाले आहे. यात पाक लष्कराच्या अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे संकेत मिळाले आहेत. या वाढत्या आंतरराष्ट्रीय निषेधाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने स्वतःची प्रतिमा वाचवण्यासाठी भारतावरच आरोप करत बनावट पुरावे सादर करण्याचा प्रयत्न केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘बांगलादेशची आठवण तुमच्या पुढच्या पिढ्यांनाही करून द्या…’ बलुच नेत्याने असीम मुनीरला दिली उघड धमकी
पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन दावा केला की त्यांनी एक “भारतीय दहशतवादी” पकडला असून, त्याच्याकडून दोन मोबाईल फोन, एक ड्रोन आणि इतर उपकरणे जप्त केली आहेत. या आधारे त्यांनी दावा केला की भारत पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया करत आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, या दहशतवाद्याच्या फोनमधील मेसेज, कॉल रेकॉर्डिंग आणि स्क्रीनशॉट पुरावा म्हणून सादर करण्यात आले. पण हेच पुरावे भारतीय सायबर तज्ज्ञांनी बारकाईने तपासले असता धक्कादायक वास्तव समोर आले.
तपासात स्पष्ट झाले की पाकिस्तानने सादर केलेले स्क्रीनशॉट डिजिटलरीत्या एडिट केलेले आहेत. अनेक मेसेज एक वर्ष जुने होते आणि त्यात वेळेची फेरफार झाल्याचे निदर्शनास आले. सर्वात मोठा खुलासा म्हणजे, पाकिस्तानच्या दाव्यानुसार अटकेत असलेला दहशतवादी ऑनलाइन दिसत होता, जे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. भारतीय तज्ज्ञांनी सांगितले की, जर आरोपीचा फोन तपासासाठी विमान मोडमध्ये असेल, तर ‘ऑनलाइन’ स्टेटस येऊ शकत नाही. यावरून पुराव्यांची फसवणूक स्पष्ट झाली.
पाकिस्तानने जप्त केलेल्या ड्रोनबाबत दावा केला की तो भारताचा आहे, पण तांत्रिक तपासणीत तो चिनी DJI कंपनीचा मॉडेल असल्याचे स्पष्ट झाले. पैशांच्या ट्रान्सफरबाबत दावा केला की भारतातून पाठवले गेले होते, पण व्यवहार पाकिस्तानमधूनच झाले होते. तसेच, दहशतवादी हिंदी-पंजाबी बोलतो असे सांगून एक ऑडिओ क्लिप सादर केली, पण तपासात क्लिपमध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे आवाज असल्याचे उघड झाले.
पाकिस्तानने सादर केलेल्या तथाकथित पुराव्यांमध्ये इतके त्रुटीपूर्ण आणि विसंगत तपशील होते की त्यांनी स्वतःच्याच कथेला फाटा दिला. जुने मेसेज, चुकीची उपकरणे, तांत्रिकदृष्ट्या अशक्य स्टेटस, आणि आवाजांची विसंगती या सर्व गोष्टींमुळे पाकिस्तानचा हा दावा केवळ हास्यास्पद ठरला नाही, तर जागतिक स्तरावरही त्याच्या दहशतवादाला आश्रय देण्याच्या इतिहासाची पुष्टी झाली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची राष्ट्रीय असेंब्लीची आपत्कालीन बैठक; शाहबाज सरकारला PTIचा पाठिंबा मिळणार का?
पाकिस्तानने भारतावरील दोषारोपासाठी पुन्हा एकदा खोट्या पुराव्यांचा आधार घेतला, मात्र भारतीय सायबर तज्ज्ञांनी त्या सर्वांचे पुराव्यानिशी खंडन केले. या प्रकारामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा समोर आला आहे. दहशतवाद्यांना संरक्षण देणारा आणि खोट्या गोष्टींचा प्रचार करणारा देश. भारत आणि जागतिक समुदायाने आता याविरोधात एकत्र येऊन कठोर पावले उचलण्याची गरज आहे.