इस्लामाबाद : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानची आर्थिक स्थिती (Pakistan Economical Crisis) अत्यंत खालावल्याची माहिती समोर येत आहे. भारतात 5 रुपयांना मिळणारे पार्लेजी बिस्किट पाकिस्तानात 50 रुपयांना विकले जात आहे. पाकिस्तानात महागाई (Pakistan Inflation) एवढी वाढली आहे की, गरीबांचे जगणे कठीण झाले आहे. अन्न विकत घ्यायचे की अत्यावश्यक बिले भरायची हे लोकांना समजत नाही.
पाकिस्तानात दूध, मैदा, मांसहारी पदार्थाच्या किमती जवळपास दुपटीने वाढल्या आहेत. सध्या पाकिस्तानात वाढलेल्या महागाई मागील सर्वात मोठे कारण पाकिस्तानातील पूर असल्याचे सांगितले जात आहे. पुरामुळे पाकिस्तानचा जवळपास एक तृतीयांश भाग पाण्याखाली गेला होता. त्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात पिके नष्ट झाली होती. पाकिस्तानचा आटा आता गरीबांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी पीठ 2000 रुपये प्रति 10 किलोने विकले जात आहे.
बासमती तांदळाची किंमत
पाकिस्तानात आता पीठासह तांदळाचाही तुटवडा निर्माण झाला आहे. वास्तविक, जेव्हा पाकिस्तानात पूर आला तेव्हा भाताचा हंगाम होता. त्यामुळे पाकिस्तानातील धान पिकाची नासाडी झाली. चार वर्षांपूर्वी 80 रुपयांच्या आसपास असलेला बासमती तांदूळ आता 150 रुपये किलोवर पोहोचला आहे.
चिकनची किंमत गगनाला भिडलीये
पाकिस्तानातही चिकनच्या किमती वाढत आहेत. चार वर्षांपूर्वीच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये चिकनची किंमत 170 रुपयांवरून 374 रुपयांपर्यंत वाढली आहे. अनेक भागात चिकनचा भाव 700 रुपये आहे. बोनलेस चिकनबद्दल झाले तर ते 1100 रुपये किलोवर पोहोचले आहे.
अंड्याची किंमत दुप्पट
2020 मध्ये 129 रुपये असलेली अंड्याची किंमत आता दुपटीने वाढली आहे. पाकिस्तानात एक ट्रे अंडी आता 385 रुपयांना विकली जात आहे.
पेट्रोल 200 च्या वर गेले
पाकिस्तानात सरकार वेळोवेळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करत आहे. पाकिस्तानमध्ये 2020 मध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 118 रुपये होती. मात्र, आता ती 215 रुपयांवर पोहोचली आहे.
कांदा 231 रुपयांना विकला जातोय
पाकिस्तानमध्ये जवळपास प्रत्येक खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या किमतीतही वाढ होत आहे. 2020 मध्ये पाकिस्तानमध्ये कांदा 60 रुपये किलो होता. 2021-22 मध्ये कांद्याचे भाव खाली आले आणि स्थिर राहिले. पण आता पाकिस्तानात 231 रुपये किलोने कांदा विकला जात आहे.