अखेर इराणने बदला घेतलाच; अमेरिकेच्या सर्वात मोठ्या लष्करी तळावर डागल्या 6 बॅलेस्टिक मिसाईल
इराण-इस्रायल युद्ध आता अमेरिका-इराण युद्धात बदलत आहे. अमेरिकेन इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर इराण त्याला कसं प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष लागलं असतानाच इराणणे कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या लष्करी तळावर थेट क्षेपणास्त्र हल्ला चढवला आहे. इराणने कतरमधील अल-उदीद (Al Udeid) लष्करी तळाच्या दिशेने सहा क्षेपणास्त्र डागल्याची माहिती आहे. युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.
मध्यपूर्वेत यापूर्वीच इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष उग्र स्वरूप धारण करत असताना, आता अमेरिकाही थेट या संघर्षात ओढली गेल्याचं चित्र समोर आलं आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, इराणकडून अमेरिकन तळांवर संभाव्य हल्ल्यासाठी क्षेपणास्त्र प्रक्षेपक आधीच सज्ज ठेवण्यात आले होते. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारपासूनच कतारमधील अल-उदीद एअरबेसवर हल्ल्याचा गंभीर धोका असल्याची चेतावणीही दिली गेली होती.
या हल्ल्याआधी दोहामध्ये जोरदार स्फोटाचे आवाजही ऐकू आले होते. इराणकडून दागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांनी कतरमधील शांतता आणि सुरक्षेला मोठं आव्हान निर्माण केलं आहे.इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलने अधिकृत निवेदनात स्पष्ट केलं की, “जो आपल्यावर जशा पद्धतीने हल्ला करतो, त्याला तसंच उत्तर दिलं पाहिजे.अमेरिकेने आमच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर बॉम्बहल्ले केले, त्याच प्रमाणात आम्हीही क्षेपणास्त्रांनी अमेरिकेच्या तळावर हल्ला केला. हा तळ शहरांपासून दूर असल्यामुळे नागरिकांना कोणताही धोका नव्हता, असंही त्यांनी म्हटलं आहे.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) देखील अधिकृतरित्या या हल्ल्याची कबुली दिली आहे.कतार सरकारने त्वरित या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. माजेद अल अंसारी यांनी म्हटलं की, “हा हल्ला केवळ कतारच्या सार्वभौमत्वाचाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या तत्वांचाही सरळ सरळ भंग असल्याचं म्हटलं आहे.
कतारच्या वायुसेनेने या हल्ल्याचा मुकाबला करत क्षेपणास्त्रांना यशस्वीरित्या इंटरसेप्ट केल्याचं सांगण्यात आलं आहे. हल्ला होण्याआधीच एअरबेस रिकामं करण्यात आलं होतं आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहितीही देण्यात आली.
डॉ. अंसारी यांनी जागतिक शांततेवर या कारवाईचे परिणाम होऊ शकतात, असा इशारा दिला आणि सर्व संबंधित पक्षांनी तात्काळ चर्चा करावी, अशी विनंती केली आहे.
दरम्यान, कतारमधील भारतीय दूतावासाने तिथल्या भारतीय नागरिकांसाठी विशेष एडव्हायजरी जारी केली आहे. सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत नागरिकांनी घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अफवांपासून दूर राहण्याचा आणि केवळ कतार सरकारकडून अधिकृतपणे दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दूतावासाने सूचनांची माहिती वेळोवेळी सोशल मीडियावरून शेअर केली जाईल, असंही सांगितलं आहे.
या घटनेनंतर संपूर्ण अरबस्थानात पुन्हा एकदा अस्थिरतेचं ढग दाटले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात थेट लष्करी संघर्ष होण्याची शक्यता वाढली असून, याचे जागतिक प्रभाव गंभीर स्वरूपाचे ठरू शकतात. संयम बाळगण्याचे आणि संवादाच्या माध्यमातून तणाव निवळवण्याचे आवाहन विविध आंतरराष्ट्रीय संस्था आणि नेत्यांकडून करण्यात येत आहे.