इस्रायलच्या हल्ल्यात ७८ नागरिकांचा मृत्यू; संतप्त इराणने रद्द केली अमेरिकेसोबतची अणुचर्चा
मध्यपूर्वेत युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, इजरायलने इराणच्या राजधानीवर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे दोन्ही देशांतील तणाव कमालीचा वाढला आहे. या भीषण हल्ल्यात किमान ७८ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ३२९ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यामुळे संतप्त इराणने अमेरिकेसोबत सुरू असलेली अणुचर्चा थांबवली असून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इजरायलने आतापर्यंत पाच टप्प्यांमध्ये तेहरानसह अनेक महत्त्वाच्या लष्करी व सरकारी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. विशेषतः उत्तरी इराणमधील तबरीज येथे १० ठिकाणी बॉम्बहल्ला केला. इजरायलच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत २० हून अधिक वरिष्ठ इराणी लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला असून, यात रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख व एअरोस्पेस फोर्स कमांडर अमीर अली हाजीजादेह यांचा समावेश आहे.
हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेसोबत सुरू असलेल्या अणुचर्चेवर तात्काळ पूर्णविराम दिला आहे. इराणी परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, “अशा आक्रमक आणि उकसवणाऱ्या कृतींनंतर कोणतीही चर्चा शक्य नाही.” यावर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देताना ” जक करार करायचा असेल तर इराणकडे अजूनही एक संधी आहे” असं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी मात्र ट्रम्प यांच्या वक्तव्याने परिस्थिती अधिक चिघळू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे.
या हल्ल्यात इराणच्या तीन प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख, रणनीती प्रमुख आणि एअर डिफेन्स प्रमुख यांचा समावेश आहे. यानंतर सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी तात्काळ या पदांवर नव्या नियुक्त्या जाहीर केल्या असून, हे सर्व अधिकारी पूर्वीही पाश्चिमात्य देशांविरोधात कठोर भूमिका घेत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
या घटनेवर संयुक्त राष्ट्रसंघाने गंभीर चिंता व्यक्त करत दोन्ही देशांना संयम ठेवण्याचे आवाहन केलं आहे. रशिया आणि चीनने इजरायलच्या कारवाईवर टीका केली असून, त्यांनी इराणच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. क्षेत्रीय विश्लेषकांच्या मते, हा हल्ला केवळ एक सामरिक कृती नसून, भविष्यातील दीर्घकालीन संघर्षाचे संकेत देतो. त्यामुळे पश्चिम आशियात तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.